अंदाजपत्रकात ८.३३ कोटींची वाढ

By Admin | Updated: November 27, 2014 00:52 IST2014-11-26T22:11:12+5:302014-11-27T00:52:23+5:30

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा : निधी संबंधित विभागाच्या योजनेकडे वर्ग करण्याचे आदेश

8.33 crores increase in budget estimates | अंदाजपत्रकात ८.३३ कोटींची वाढ

अंदाजपत्रकात ८.३३ कोटींची वाढ

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या सन २०१४-१५च्या मूळ अंदाजपत्रकात ८ कोटी ३३ लाख रूपयांची वाढ करत २० कोटी ५३ लाख ८८ हजार ७३० रूपयाच्या सुधारीत अंदाजपत्रकास बुधवारच्या जिल्हा परिषद खास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. तर सौरपथदीप आणि सौरकंदिल योजनेवरील तरतूद लाखो रूपयांचा निधी संबंधित विभागाच्या अन्य योजनेकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले.
जिल्हा परिषदेची खास सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपाध्यक्ष रणजीत देसाई, सभापती अंकुश जाधव, गुरूनाथ पेडणेकर, स्रेहलता चोरगे, संजय बोबडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, संतोष धोत्रे, सदस्य सतीश सावंत, मधुसुदन बांदिवडेकर, दीपलक्ष्मी पडते, सदाशिव ओगले, सुकन्या नरसुले, संग्राम प्रभूगावकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे २०१४-१५चे मूळ अंदाजपत्रक १२ कोटी २० लाख ५० हजार रूपयांचे होते. या अंदाजपत्रकात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून बुधवारी सभागृहात चर्चा करण्यात आली. या मूळ अंदाजपत्रकात ८ कोटी ३३ लाख ३९ हजार रूपयांची वाढ करून ते २० कोटी ५३ लाख ८८ हजार रूपये एवढे करण्यात आले.
जिल्हा परिषद अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थान दुरूस्ती- ४० लाख तरतूद, पाटबंधारे- ४० लाख, जिल्हा परिषद सार्वजनिक विहीर दुरूस्ती- ६० लाख, घरदुरूस्ती- २० लाख, सिंधु महोत्सव- १० लाख तरतूद, आरोग्य विभाग- १६ लाख, ग्रामीण भागातील पायवाट, सिंधुरत्न पुरस्कार- १ लाख, स्पर्धा परीक्षेसाठी १ लाख तरतूद, अचानक लागलेल्या वणव्यासाठी नुकसान भरपाईसाठी २.५० लाख अशाप्रकारे सुधारीत वाढ करण्यात आली.
सौरपथदीप, कंदिल
योजनेची रक्कम वळवली
सौरपथदीप, सौरकंदिल योजनेतून पुरविण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे पुरविले जाते. त्यामुळे पथदीप बंद होऊन जिल्हा परिषदेची बदनामी होते. त्यामुळे सौरपथदीप आणि सौरकंदिल योजनेसाठी करण्यात आलेली तरतुदीची रक्कम संबंधित विभागाच्या अल्प योजनेसाठी खर्च करण्याचे निर्देश दिले.
शालेय गणवेश निश्चित
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन गणवेश निश्चित करण्यात आला आहे. यात आकाशी रंगाची पॅन्ट व हिरव्या रंगाचा शर्ट तर मुलींसाठी आकाशी रंगाचा स्कर्ट तर हिरव्या रंगाचा ब्लाऊज असा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्यात अद्यापही अनेक घरे मातीची कच्च्या स्वरूपाची आहेत. अशा घरांची दोन महिन्यात ग्रामपंचायतीमार्फत सर्व्हे करून यादी तयार करा. पाणलोटमधून जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होतो. याची पाहणी करून त्याचा अहवाल पुढील सभेत सादर करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिले.
कणकवली तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून या योजनेचे ५० मस्टर अपूर्ण आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडत असून कणकवली बीडीओंकडील चार्ज काढून अन्य अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी सूचना सदस्य सतीश सावंत यांनी मांडत त्यांना ही योजनाच राबवायची नाही, असा आरोप केला.(प्रतिनिधी)

पन्नास घरे अद्यापही अंधारात
सिंधुदुर्गात गरीबांच्या ५० घरकुलांना अद्यापही वीजपुरवठा नसल्याने ती घरे वीज महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही अंधारात आहेत. त्या घरांना तत्काळ वीजपुरवठा करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले.

Web Title: 8.33 crores increase in budget estimates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.