हत्ती हटावसाठी ८0 लाखांचा निधी मंजूर
By Admin | Updated: June 22, 2014 01:42 IST2014-06-22T01:27:49+5:302014-06-22T01:42:13+5:30
केसरकरांची माहिती : मुंबईत झाली बैठक

हत्ती हटावसाठी ८0 लाखांचा निधी मंजूर
सावंतवाडी : हत्ती हटाव मोहिमेसाठी शासनाने ८० लाखांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतची बैठक उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या दालनात नुकतीच पार पडल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आंबोली, गेळे, चौकुळ पर्यटनाचा आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागाने तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केसरकर म्हणाले, हत्ती हटाव मोहिमेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे शासनाने मान्य केले आहे. यासाठी निधीची कमतरता अर्थमंत्री अजित पवार यांनी भरून काढली आहे. या मोहिमेसाठी ८० लाखांचा निधी त्यांनी देण्याचे मान्य केले आहे. हा निधी लवकर प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. आंबोली, गेळे व चौकुळला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याला पर्यटन विभागाने मान्यता दिली असून, त्यासाठी निधी उभा करण्याचे कामही पर्यटन विभाग करणार आहे. याबाबतची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तिलारीतील उन्नई बंधाराही पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणार आहे. तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेणार आहे. लवकरच या विषयावर तोडगा काढणार असून, तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना आपले आंदोलन स्थगित करण्यास सांगणार असल्याचे यावेळी केसरकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)