रेल्वेच्या सात गाड्या अपघातामुळे रद्द

By Admin | Updated: October 7, 2014 23:41 IST2014-10-07T22:29:49+5:302014-10-07T23:41:54+5:30

रेल्वेच्या मदतीला एस. टी. धावली

7 trains canceled due to an accident | रेल्वेच्या सात गाड्या अपघातामुळे रद्द

रेल्वेच्या सात गाड्या अपघातामुळे रद्द

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर कामथेजवळ झालेल्या मालगाडीच्या दुर्घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली असून, यामुळे आज लांब पल्ल्याच्या सहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. सात गाड्या रद्द करण्यात आल्या, तर तीन गाड्यांमधील प्रवाशांची कामथे-चिपळूण स्थानकांदरम्यान बसद्वारे ने-आण करण्यात आली. अपघातामुळे वाहतूक ठप्प झाल्याने रत्नागिरीसह सर्वच स्थानकांवर प्रवाशांचे मोठे हाल झाले. गाड्याच नसल्याने प्रवाशांना घरचा रस्ता धरावा लागला.
रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये सावंतवाडीकडे जाणारी मांडवी, जनशताब्दी, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर तसेच मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी, जनशताब्दी व सावंतवाडी-दिवा पॅसेंजरचा समावेश आहे. ज्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले त्यात मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस, वेरावळ एक्सप्रेस, हापा एक्सप्रेस तसेच मडगावकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, कोचुवेली एक्सप्रेसचा समावेश होता. कामथे व चिपळूण स्थानकांदरम्यान ज्या गाड्यांमधील प्रवाशांची दुसऱ्या गाड्यांमध्ये व्यवस्था करण्यासाठी ने-आण करण्यात आली त्यामध्ये केरळा संपर्क क्रांती, गोवा संपर्क क्रांती व मंगला एक्सप्रेसचा समावेश होता. आजच्या गाड्या रद्द झाल्याने तिकिटांचे पैसे परत घेण्यासाठी स्थानकातील तिकीट कक्षात प्रवाशाची झुंबड उडाली होती, तर ज्यांच्या दुपारनंतर सुटणाऱ्या गाड्या होत्या, त्यांनीही दुपारी तिकिटे परत करून आपला तिकीट परतावा स्वीकारला. ज्यांना तातडीने बाहेरगावी जायचे होते, त्यांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे पसंत केल्याचेही दिसून आले. (प्रतिनिधी)

रेल्वेच्या मदतीला एस. टी. धावली
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण ते कामथे रेल्वेस्थानकाच्या मध्ये मालगाडीचे डबे घसरून झालेल्या अपघातामुळे रेल्वेवाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या अडकून पडलेल्या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी एस. टी. धावली असून, ३० गाड्यांव्दारे प्रवासी वाहतूक सुरू आहे.
कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी घसरून होणाऱ्या अपघातात वाढ होत आहे. पूर्वी पावसाळ्यात दरड रूळावर कोसळल्याने वाहतूक ठप्प होत होती. मात्र, आता मालगाड्या घसरत असल्याने त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत आहे. एकेरी मार्ग असल्याने रो-रो, मालगाडी व प्रवासी वाहतूक सुरू असते. सकाळी ७.४५च्या दरम्यान घडलेल्या अपघातामुळे प्रवासी वाहतूक कोलमडली. त्याचदरम्यान मुंबईकडून आलेल्या गाड्या चिपळुणात, तर मडगाव कडून आलेल्या गाड्या रत्नागिरी स्थानकात थांबवण्यात आल्या. काही गाड्या रत्नागिरीतून मडगावकडे, तर काही चिपळुणातून मुंबईकडे सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. त्यामुळे रत्नागिरी ते चिपळूण व परत अशा दुहेरी प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेने परिवहन महामंडळाकडून तीस गाड्यांची मदत घेतली आहे. तीस गाड्यांतून प्रवासी वाहतूक सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 7 trains canceled due to an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.