जिल्ह्यातील खेळाडूंना ७ पदके
By Admin | Updated: November 24, 2014 23:04 IST2014-11-24T22:11:20+5:302014-11-24T23:04:07+5:30
अहमदनगर येथील राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा

जिल्ह्यातील खेळाडूंना ७ पदके
नांदगांव : रोप स्किपिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्रच्यावतीने अहमदनगर येथे झालेल्या सहाव्या राज्यस्तरीय रोप स्किपिंग चॅम्पियनशीप व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत या स्पर्धेत १ सुवर्ण, १ रौप्य व ५ कास्यपदकासह एकूण ७ पदकांची कमाई केली आहे.
जिल्ह्यातून एकूण १३ खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी ६ खेळाडूंची गुजरात येथे होणाऱ्या १६ व्या राष्ट्रीय रोप स्किपिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंमध्ये ११ वर्षांच्या गटात रिया गोसावी (ओरोस), फ्रि स्टाईल सुवर्णपदक, तन्वी डोईफोडे फ्रि स्टाईलमध्ये रौप्यपदक तर मिहिर कुबडे (कासार्डे) याने कास्यपदक पटकावले. १७ वर्षांच्या वयोगटात सिंगल रोप स्पीड रिले प्रकारात कासार्डेच्या साईप्रसाद बिजितकर, मिहिर कुबडे, दीपेश तळेकर व सूर्यकांत चव्हाण यांच्या टीमने कास्यपदक पटकावले. वैयक्तिक गटात स्पीड स्प्रिंट (३० सेकंद) प्रकारात दीपेश तळेकर (तळेरे) याने कास्यपदक पटकावले.
या यशस्वी खेळाडूंचे गुजरातमधील आनंद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या टीममध्ये निवड झाली आहे. या खेळाडूंना रोप स्किपिंगचे मुख्य प्रशिक्षक दत्तात्रय मारकड पंच व प्रशिक्षक अभिजीत शेट्ये, राकेश मुणगेकर, निळकंठ शेट्ये, रुपेश कानडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंचे रोप स्किपिंग असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार, कासार्डे विद्यालयाचे प्राचार्य पी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)