आरामबसमधून ६० हजारांचा ऐवज चोरीस
By Admin | Updated: December 23, 2014 00:55 IST2014-12-23T00:42:20+5:302014-12-23T00:55:17+5:30
मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे घटना

आरामबसमधून ६० हजारांचा ऐवज चोरीस
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर वागदे येथे हॉटेलसमोर थांबलेल्या आरामबसमधील २० हजार रुपये रोख रकमेसह ६० हजारांचा ऐवज चोरीस गेला. आज, सोमवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी अनिता अनंत म्हात्रे (रा. मुंबई) यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
अनिता म्हात्रे नीता व्हॉल्व्हो या आरामबसने (एम. एच.-०४-एफके-६३६४) मुुंबईहून गोव्याला जात होत्या. कणकवलीनजीक वागदे येथील स्वीट चिली हॉटेलसमोर नाश्ता करण्यासाठी बस थांबविण्यात आली. त्यावेळी अनिता म्हात्रे आपली पर्स बसमध्येच ठेवून खाली उतरल्या. त्यांच्यासोबत इतर प्रवासीही उतरले. पुन्हा बसमध्ये परतल्यानंतर त्यांना आपली पर्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. पर्समध्ये सुमारे २० हजार रुपये किमतीचा अॅपल कंपनीचा मोबाईल आणि २० हजार रुपयांची रोकड होती, तर अन्य प्रवासी शशिकांत सक्सेना यांचा सुमारे २० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरीस गेला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. (प्रतिनिधी)