ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ५९ गावे बाधित झाली असून, यात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचा असे एकूण सुमारे २१ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल सोमवारी जाहीर केला आहे. यात ५४ पक्क्या घरांचे व २ कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तर दोन व्यक्तींचा मृत्यूदेखील झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात अक्षरशः मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. त्यात सोसाट्याचा वारा, वादळी पाऊस यामुळे अनेक भागांत पडझड झाली आहे. २० मे ते २५ मे या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५९ गावे बाधित झाली आहे.यात सार्वजनिक आणखी खासगी मालमत्तेचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. यात १ सार्वजनिक मालमत्तेचे १५ हजार रुपयांचे, ५४ पक्क्या घरांचे अंशतः नुकसान होऊन २० लाख २४ हजार १७० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर २ कच्च्या घरांचे अंशतः नुकसान होत त्यांचे १ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, असे एकूण २१ लाख ४४ हजार १७० रुपयांचे नुकसान झाले आहे.नुकसानीचा आकडा वाढणारप्रशासनाने २१ लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात आज रेड अलर्ट, २८ ते ३० मे ऑरेंज अलर्ट जिल्ह्यात २६ मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता. तर २७ मे रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला असून या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची आणि ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच २८ ते ३० मे या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
| तालुका | बाधित गावे | सार्वजनिक मालमत्ता | पक्की घरे | नुकसान | कच्ची घरे | नुकसान |
| दोडामार्ग | ३ | ० | ३ | २७,६२० | ० | ० |
| सावंतवाडी | १० | १ (१५,०००) | १० | ४,४४,४५० | ० | ० |
| वेंगुर्ला | ४ | ० | ३ | ५१,००० | १ | ४५,००० |
| कुडाळ | ५ | ० | ४ | ५५,००० | ० | ० |
| मालवण | १६ | ० | १५ | ५,२१,८०० | १ | ६०,००० |
| कणकवली | ८ | ० | ६ | ६,०५,७५० | ० | ० |
| देवगड | ८ | ० | ८ | २,३२,७५० | ० | ० |
| वैभववाडी | ५ | ० | ५ | ८५,८०० | ० | ० |
| एकूण | ५९ | १ | ५४ | २,२०,२४,१७० | ० | १,०५,००० |