कणकवली तालुक्यासाठी ५.८३ कोटींचा निधी
By Admin | Updated: August 13, 2014 23:40 IST2014-08-13T20:32:15+5:302014-08-13T23:40:03+5:30
मैथिली तेली : जिल्हा नियोजनमधील विकासकामांची माहिती

कणकवली तालुक्यासाठी ५.८३ कोटींचा निधी
कणकवली : कणकवली तालुक्यासाठी जिल्हा नियोजनमधून ५ कोटी ८३ लाख १३ हजार रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. विकासकामांसाठी हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती सभापती मैथिली तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसभापती बबन हळदिवे उपस्थित होते.
डोंगरी विकासअंतर्गत रस्ते दुरूस्तीसाठी ७७ लाख ५० हजार रूपये, ग्रामीण तीर्थक्षेत्र क वर्ग अंतर्गत यात्रास्थळ विकासासाठी ५५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण मार्गांसाठी १ कोटी १० लाख ५० हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत. पूरहानीअंतर्गत १ कोटी ९० लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये साकव दुरूस्ती, संरक्षण भिंंत बांधणे व दुरूस्ती, मोरी, कॉजवे दुरूस्ती या कामांचा समावेश आहे. साकव दुरूस्तीसाठी ३४ लाख २० हजार रूपये, धावपट्टी सुधारणा ९६.३५ लाख, संरक्षण भिंत दुरूस्तीसाठी २ लाख, संरक्षण भिंंत बांधकामासाठी २५.९० लाख, मोरी दुरूस्तीसाठी ९ लाख ३५ हजार, कॉजवे दुरूस्तीसाठी ३.२५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. नागरी सुविधाअंतर्गत कामांसाठी २८.१० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. जनसुविधा कामांसाठी ८० लाखांचा निधी देण्यात आला आहे. तर रस्ते व पूल दुरूस्तीसाठी ४२.०३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. असा एकूण ५ कोटी ८३ लाख १३ हजार रूपयांचा निधी २०१४-१५ या वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे. कामांचे प्रस्ताव यापुढे सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. ग्रामीण तीर्थक्षेत्र क वर्ग यात्रास्थळांच्या विकासाअंतर्गत पियाळी स्वयंभू मंदिर सुशोभिकरण, आशिये दत्तमंदिर रस्ता सुधारणा, भिरवंडे गणपती मंदिर ते रामेश्वर मंदिर रस्ता, वारगांव-कोळंबा मंदिर सुशोभिकरण, भिरवंडे रामेश्वर मंदिराकडे पार्किंग व गटार या कामांसाठी प्रत्येकी १० लाख रूपये आणि कळसुली गिरोबा मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी ५ लाख रूपये अशी कामे घेण्यात आली आहेत. जनसुविधाअंतर्गत तळेरे, दारिस्ते, दारूम ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारती उभारणीसाठी प्रत्येकी १० लाख रूपये तर सांगवे, नरडवे, बोर्डवे स्मशानभूमी शेडसाठी प्रत्येकी ३ लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)