५८ टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी
By Admin | Updated: July 30, 2014 22:59 IST2014-07-30T22:51:21+5:302014-07-30T22:59:01+5:30
१५ ते ४९ वयोगट : महिला बालविकास समिती सभेत उघड

५८ टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ ते ४९ वयोगटातील १३७ महिलांचे हिमोग्लोबीनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची चिंताजनक बाब आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ५८ टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याचे यावेळी महिला व बालविकास समिती सभेत उघड झाले. दरम्यान, या सर्व महिलांमधील घटलेले हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समिती सभापती श्रावणी नाईक यांनी दिली. जिल्हा परिषद महिला व बालविकास समिती सभा सभापती श्रावणी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्या निकिता परब, वंदना किनळेकर, निकिता तानवडे, रुक्मिणी कांदळगावकर, वृंदा सारंग, शिल्पा घुर्ये, स्नेहलता चोरगे, समिती सचिव तथा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते. महिलांमधील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात याची माहिती सभागृहात सदस्यांनी मागितली असता किशोरवयीन मुली, गरोदर माता व स्तनदा माता यांना आरोग्य विभागामार्फत हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी गोळ्यांचा पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, उर्वरित महिलांमधील हिमोग्लोबीनच्या प्रमाणाची स्थिती काय? याबाबत विचारणा करत संबंधित महिलांची तपासणी करण्याचे आदेश सभागृहात देण्यात आले होते. जिल्ह्यात १५ ते ४९ वयोगटातील १ लाख ४२ हजार ७0४ महिला असून यापैकी ९७ हजार ४८४ महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली आहे. तर उर्वरित ४५ हजार २२0 महिलांची तपासणी प्रक्रिया सुरु असून येत्या महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. अंगणवाडीच्या मुख्य सेविकांना जिल्हा परिषद मार्फत पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून उपलब्ध निधीनुसार नियोजन करण्यात येणार आहे. तर शासन आदेशानुसार आहारविषयक माहिती देण्यासाठी आता बैठका होणार असून यामध्ये गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींचा समावेश झाला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला बचतगटांना मसाला गिरण देण्यासाठी योजना राबविण्याचा ठराव घेण्यात आला. (प्रतिनिधी)