४0 निवाडे भूसंपादनासाठी शासनास सादर
By Admin | Updated: December 2, 2014 00:24 IST2014-12-01T22:32:21+5:302014-12-02T00:24:20+5:30
ज्ञानेश्वर खुटवड : लोकशाही दिनानंतर दिली माहिती

४0 निवाडे भूसंपादनासाठी शासनास सादर
सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची प्रक्रिया सुरु झाली असून सिंधुदुर्गातील ८३ किलोमीटर लांबी (लेंथ)च्या रस्त्याची भूसंपादनाच्या नवीन निकषानुसार मोजणी सुरु असून या मार्गावरील कुडाळ १८ तर कणकवली तालुक्यात २२ अशा एकूण ४० निवाडे भूसंपादनासाठी शासनास सादर केले आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी लोकशाही दिनाच्या पत्रकार परिषदेत दिली.
सोमवारी जिल्हाधिकारी दालनात लोकशाही दिन निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत खुटवड बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक अनंत आरोसकर, नायब तहसीलदार शरद गोसावी, जिल्हा माहिती अधिकारी संध्या गरवारे उपस्थित होते. सन २०१७ पर्यंत महामार्ग चौपदरीकरण पूर्ण करावयाचे प्रस्तावित आहे.
त्या अनुषंगाने भूसंपादनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कुडाळ व कणकवली तालुक्यातील ४० प्रस्ताव हे भूसंपादनासाठी प्राप्त झाले असून त्यांची नवीन कायद्यानुसार मोजणी करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख मोजणी करून संपादनाच्या हद्दी ठरवून नोटीफिकेशन दिले जाणार असून ४० प्रस्तावांमध्ये एकूण ८३ किलोमीटरची भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
हत्तींचा पर्यटनासाठी वापर होणार?
सध्या जंगली हत्तींनी जिल्ह्यात उच्छाद मांडला असून जिवीत तसेच वित्तहानी सुरु केली आहे. यावर अद्यापही ठोस उपाययोजना निघत नाही. याबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, हत्तींना प्रशिक्षित करून ते पर्यटनासाठी वापरण्यास मुभा द्यावी. अन्यथा हत्तींना सिंधुदुर्गातून कर्नाटकात घालविण्यासाठी आदेश मिळावेत हे दोन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून त्यासाठी निधीचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच हत्तींचा बंदोबस्त या मागणीसाठी वनअधिकारी रमेशकुमार हे दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली. (प्रतिनिधी)
‘त्या’ ठेकेदारास नोटीस
सिंधुदुर्गनगरी प्राधीकरण क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी ५० लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र हे रस्ते पहिल्याच पावसात उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यानंतर ‘त्या’ ठेकेदाराकडून हे खड्डे डांबरीकरणातून बुजविण्यात आले होते. मात्र दुसऱ्या पावसात रस्ते पुन्हा खडबडीत झाले. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत का टाकू नये अशा आशयाची नोटीस प्रशासनाकडून बजावण्यात आली असल्याची माहिती खुटवड व शरद गोसावी यांनी दिली.
लोकशाही दिनात दोन तक्रारी
आजच्या लोकशाही दिनात दोन तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. यात पहिली तक्रार ही न्हानू पालव यांची असून त्यांचे असे म्हणणे आहे की, पशुसंवर्धन उपायुक्त विभागामार्फत राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये सहा गाई खरेदीसाठी, गोठा व कडबाकुट्टी मशिन खरेदीसाठी या विभागाकडून ५० टक्के अनुदान मिळालेले नाही. तर दुसरी तक्रार ही लक्ष्मी पाटील यांची असून इंदिरा आवास योजनेंतर्गत त्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा मिळावी अशी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.