३९ प्रवाशांना जीवदान देणाऱ्या चालकाचा गौरव
By Admin | Updated: August 20, 2016 00:21 IST2016-08-19T23:01:15+5:302016-08-20T00:21:19+5:30
एसटीतर्फे सन्मानित : प्रसंगावधान राखून केलेल्या कार्याची वरिष्ठ पातळीवरून दखल

३९ प्रवाशांना जीवदान देणाऱ्या चालकाचा गौरव
सावंतवाडी : ३९ प्रवाशांना जीवदान देणारे सावंतवाडी आगाराचे एस.टी. बसचालक बाबली जगन्नाथ तुळसकर यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागामार्फत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन जिल्ह्याचे विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
बसचालक हा एस.टी.चा मुख्य घटक असतो. चालकाच्या अंगी असणाऱ्यासर्व योग्य गुणांच्या आधारावर बसचा प्रवास सुरू असतो. असाच प्रवास सुरू असताना ३ जुलै रोजी चालक बाबली जगन्नाथ तुळसकर यांनी थरारक प्रसंग अनुभवला. तुळसकर यांनी प्रसंगावधान राखून ३९ प्रवाशांचे प्राण वाचविले होते. सावंतवाडी आगारातील चालक बाबली तुळसकर व वाहक गुरुनाथ पिळणकर हे ३ जुलै रोजी नियोजित ड्युटी दोडामार्ग ते मांगेली मार्गावर जात होते. दरम्यान, वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे वीज तारा रस्त्यावर तुटून पडल्या होत्या. यावेळी अचानक वीज तारा बसवर कोसळल्याने विजेचा सौम्य धक्का चालक तुळसकर यांना बसला. मात्र, अशा कठीण परिस्थितीही न डगमगता या विद्युत प्रवाहाच्या तारापासून सुरक्षित बस नेत बसमधील ३९ प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचविले होते. या घटनेची दखल वरीष्ठ पातळीवरून घेत त्यांना गौरविण्यात आले. तुळसकर यांच्या धैर्यवान कर्तृत्वाने विविध सामाजिक स्तरावर विशेष कौतुक होत आहे. (वार्ताहर)