सिंधुदुर्गात ३८ जणांचे अर्ज दाखल

By Admin | Updated: September 28, 2014 00:18 IST2014-09-28T00:18:52+5:302014-09-28T00:18:52+5:30

बहुरंगी लढतीची शक्यता : सावंतवाडीत सर्वाधिक १६ उमेदवारांचे अर्ज

38 nominations filed in Sindhudurg | सिंधुदुर्गात ३८ जणांचे अर्ज दाखल

सिंधुदुर्गात ३८ जणांचे अर्ज दाखल

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांसाठी आता ३८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत बहुरंगी लढती होणार आहेत.
आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये कुडाळ मतदारसंघातून उद्योगमंत्री नारायण राणे, कणकवली मतदारसंघातून आमदार प्रमोद जठार, काँग्रेसतर्फे नीतेश राणे यांच्यासह सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी आमदार दीपक केसरकर, काँग्रेसतर्फे बाळा गावडे, राष्ट्रवादीतर्फे सुरेश दळवी यांचा समावेश आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदारसंघांत आज काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या उमेदवारांनी मिरवणुकांतून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
कणकवलीत १३ उमेदवार
कणकवली मतदारसंघातून काँग्रेसतर्फे नीतेश राणे यांनी मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्योगमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत, आदी उपस्थित होते. त्याअगोदर भाजपतर्फे आमदार प्रमोद जठार यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी भगवती मंगल कार्यालयात मेळावा घेतला. मेळाव्यानंतर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली होती. त्यानंतर शिवसेनेतर्फे सुभाष मयेकर आणि राष्ट्रवादीतर्फे अतुल रावराणे यांनी अर्ज दाखल केला.
अपक्ष आणि राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून डॉ. अभिनंदन नीळकंठ मालंडकर, बसपतर्फे चंद्रकांत आबाजी जाधव, भाजपतर्फे डमी उमेदवार संजय पाताडे, अपक्ष म्हणून सुजित सुधाकर तावडे, अपक्ष म्हणून विश्वनाथ विष्णू पडेलकर यांनी आज अर्ज दाखल केले. कणकवली मतदारसंघात आतापर्यंत १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
सावंतवाडीत १६ उमेदवार
सावंतवाडी मतदारसंघातून आज अकराजणांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात आतापर्यंत १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सावंतवाडी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुरेश दळवी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे परशुराम उपरकर, शिवसेनेतर्फे दीपक केसरकर, भारतीय जनता पक्षाचे राजन तेली, राष्ट्रीय काँग्रेसतर्फे चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे सुपूर्द केले. सहाजणांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
सावंतवाडी, कणकवलीत पंचरंगी, कुडाळात चौरंगीची शक्यता
सावंतवाडी मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसे या प्रत्येक प्रमुख पक्षाचा एक उमेदवार रिंगणात असल्याने तर कणकवलीतही प्रमुख चार पक्षांसह अपक्ष म्हणून विजय सावंत यांनी अर्ज दाखल केल्याने येथे पंचरंगी लढत होईल, तर कुडाळमध्ये सर्व प्रमुख चार पक्षांमध्ये चौरंगी लढत होणार आहे. कु डाळ मतदारसंघातून काँग्रेसतर्फे नारायण राणे, भारतीय जनता पक्षातर्फे विष्णू मोंडकर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुष्पसेन सावंत व शिवसेनेतर्फे वैभव नाईक यांनी अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष म्हणून तीन उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत.

Web Title: 38 nominations filed in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.