कार्यक्षेत्रातील ३२ मातांचा सत्कार
By Admin | Updated: August 3, 2015 21:29 IST2015-08-03T21:29:54+5:302015-08-03T21:29:54+5:30
रुग्णकल्याण समितीचा उपक्रम : उंबर्डे आरोग्य केंद्राचा पुढाकार

कार्यक्षेत्रातील ३२ मातांचा सत्कार
वैभववाडी : उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून ‘मुलींच्या जन्माचे स्वागत’ या कार्यक्रमात एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन केलेल्या कार्यक्षेत्रातील ३२ मातांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्या मुलींच्या नावे प्रत्येकी एक हजार रुपयांची बचतपत्रे त्यांच्या मातांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.रुग्णकल्याण समितीची सभा जिल्हा परिषदेचे सदस्य धोंडूशेठ पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, तालुका आरोग्य अधिकारी सी. वाय. महारनुर, रावराणे, आदी उपस्थितीत होते.यावेळी चोरगे म्हणाल्या, स्त्री भ्रूणहत्या रोखणे काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे मुलांइतकीच मुलीलाही घरात सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे. मुलगा, मुलगी असा भेदभाव न करता मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देणे ही आई आणि वडिलांची सामूहिक आणि सामाजिक जबाबदारी आहे.
चोरगे म्हणाल्या की, मुलींनी सर्व क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे अज्ञानातून निर्माण झालेल्या रुढी परंपरांच्या चौकटीतून बाहेर पडून पालकांनी सजग होण्याची गरज आहे. सत्कार झालेल्या मातांचा इतर महिलांनी आदर्श घेऊन पहिल्या किंवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर मुलगाच हवा ही घरच्यांची अपेक्षा बाजूला सारून कुटुंब नियोजनासाठी पुढे यावे, असे आवाहन चोरगे यांनी केले. यावेळी धोंडूशेठ पवार यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)