मुंबईच्या सराफाची २७ लाखांच्या दागिन्यांची बॅग लंपास
By Admin | Updated: August 23, 2015 23:29 IST2015-08-23T23:29:19+5:302015-08-23T23:29:43+5:30
दोन लाखांची रोकड पळविली : संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईच्या सराफाची २७ लाखांच्या दागिन्यांची बॅग लंपास
देवरूख : दादर येथील एका सोन्याच्या व्यापाऱ्याकडील २७ लाख रुपयांचे दागिने व दोन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग थेट आरामबसमधून लांबवल्याची खळबळजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे शनिवारी रात्री घडली. अज्ञात चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राकेश महेंद्र्र जैन यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जैन यांचा सोने, चांदीचा व्यवसाय आहे. दादर या ठिकाणी जैन यांची पेढी आहे. ते शनिवारी रात्री सोन्याचे दागिने घेऊन औदुंबर आरामबसमधून (एमएच- ४६/जे- ३६६३) रत्नागिरीहून दादरकडे जात होते. मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी येथील मुकुंद कृपा हॉटेलमध्ये जेवणासाठी उतरले होते. यावेळी आपल्या ताब्यातील बॅग जैन यांनी बसमध्येच ठेवली होती.
दरम्यान, आरामबसमध्ये कोणीच नसल्याची संधी अज्ञाताने साधून जैन यांची बॅग लंपास केली. जैन हे जेवण आटोपून पुन्हा आरामबसमध्ये आले असता, दागिने व रोख रक्कम असलेली बॅग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे जैन यांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वत्र शोधाशोध करूनही बॅग न सापडल्यामुळे जैन यांनी थेट संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेत झाडाझडती घेण्याबरोबर पंचनामा करण्यात आला.
यामध्ये २७ लाख रुपयांचे चेन, नेकलेस आदी दागिने व दोन लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार शनिवारी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला. जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपास पोलीस निरीक्षक मनोहर चिखले करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेजवरून या चोरट्याचा शोध घेणे सोयीस्कर होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)