२५ कोटी रूपयांच्या पीक कर्जाची उचल
By Admin | Updated: August 9, 2014 00:38 IST2014-08-08T21:35:19+5:302014-08-09T00:38:48+5:30
५00 बागायतदारांचा समावेश : देवगड तालुक्यातील आंबा लागवड

२५ कोटी रूपयांच्या पीक कर्जाची उचल
पुरळ : देवगड तालुक्यामध्ये आंबा बागायतदारांनी विविध बँकांकडून सुमारे २५ कोटीचे आंबा पीक कर्जाची उचल केली असून सुमारे ५०० आंबा बागायतदारांच्या सात-बारावर आंबा पीक कर्जाच्या बोजाची नोंद झाल्याचे दिसून येत आहे. बँक आॅफ इंडियाच्या माध्यमातून १० कोटीचे आंबा पीक कर्ज देण्यात आले आहे. आंबा पीक कर्जाच्या व्याजाला सवलत असल्याने जास्तीत जास्त शेतकरी कर्ज घेत असल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांचे हीत जोपासण्यासाठी शासनाच्या अनेक कर्ज सवलती योजना आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीकोनातून विविध बँकांनी कर्ज पुरवठा करीत आहेत. देवगड तालुक्यामध्ये सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा कलम लागवड आहे.
यावर्षी म्हणजेच सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात बँक आॅफ इंडिया देवगड, मिठबाव, शिरगाव, तळेबाजार, वाडा, पडेल, विजयदुर्ग या शाखांमधून सुमारे १० कोटीचे आंबा पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. आंबा पीक कर्जाला व्याज सवलत आहे. पंजाबराव देशमुख या योजनेतून आंबा पीक कर्जाला व्याज सवलत देण्यात येते.
शेतकऱ्यांना सधन बनविण्याच्या दृष्टीकोनातून बँक आॅफ इंडिया सवलतीपर कर्ज देऊन प्रयत्न करीत आहे. देवगड तालुक्यामध्ये आंबा बागायतदारांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून व दलालांच्या कर्जाच्या विळख्यातून सुटका होण्यासाठी पुढाकार घेऊन सर्वप्रथम प्रत्येक वर्षाला २५ ते ३० कृषी मेळाव्याचे आयोजन करून कृषीविषयक कर्जाची माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रगतशील बनविण्याच्या मार्गावर नेण्याचे
काम या बँकेने केले असून पुढे करण्याचेही काम ही बँक करीत आहे. फळ लागवड आंबा प्रक्रिया उद्योग स्वतंत्र आंबा विक्री केंद्र उभारून आज देवगडचा शेतकरी बँकांच्या अर्थ सहाय्याने उभारी घेत आहे. कर्ज घेण्याची एक मनामध्ये मानसिकता वेगळी होती. मात्र, ही मानसिकता शेतकऱ्यांची बदलून लाखो रूपयांचे कर्ज घेऊन बागायतदार उभारी घेत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रगत असल्याचे व सधन असल्याचे म्हटले जाते. याचे एकमेव कारण तेथील शेतकरी शेतीविषयक शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आणून कोकणी शेतकरीही झेप घेत आहे. मात्र, कोकणी शेतकऱ्याला निसर्गाची साथ योग्य प्रमाणात मिळत नसल्याने तो थोडाफार मागे आहे. निसर्गाने कोकणी शेतकऱ्याला साथ दिली तर कोकणातील शेतकरी उत्पन्नाच्या बाबतीत देशामध्ये अग्रेसर असू शकतील, याबाबत शंका असण्याची गरज नाही. (वार्ताहर)
दलालांची पिळवणूक थांबण्यास मदत होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त आंबा पीक कर्ज देण्यात आले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, अर्बन बँक देवगड, विविध सहकारी सेवा सोसायट्या, स्टेट बँक, युनियन बँक यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये सुमारे १५ कोटीचे आंबा पीक कर्ज देण्यात आले आहे. काही वर्षापूर्वी आंबा बागायतदार हा दलालांकडून कर्ज घेऊन आंब्याची मशागत व कलम लागवड करायचे. यामुळे दलाल वर्गाकडून बागायतदारांची पिळवणूक करून आगावू कर्ज घेतल्याने आंबा पेटीमध्ये पेटीचा भाव कमी द्यायचे. ही पद्धत आजही दलालांकडून कर्ज घेतलेल्या आंबा बागायतदारांबाबत होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बागायतदार हैराण झाले आहेत.