१९ तासांनी ‘विदेशी’ जमिनीवर
By Admin | Updated: May 24, 2016 00:52 IST2016-05-24T00:01:59+5:302016-05-24T00:52:07+5:30
वेंगुर्लेत प्रशासनाची कसरत : रविवारी चढला होता दीपगृहाच्या टॉपवर

१९ तासांनी ‘विदेशी’ जमिनीवर
'वेंगुर्ले : वेंगुर्ले दीपगृहाच्या टॉॅपवर रविवारी चढून बसलेला विदेशी पर्यटक अॅन्थोनी अॅन्टोएवीज हा स्वत:हून सोमवारी सकाळी ६.१५ वाजता दीपगृहावरून खाली उतरला. विदेशी पर्यटकाच्या सोबत असलेल्या अभिजित दास याच्या सहकार्याने त्याला वेंगुर्ले पोलिस पथकाने पोलिस ठाण्यात आणले.
रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून दीपगृहाच्या टॉपवर चढून बसलेला व शासकीय यंत्रणांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करणारा विदेशी पर्यटक सोमवारी सकाळी ६.१५ वाजता आपणहून खाली उतरला. त्यास वेंगुर्ले पोलिसांच्या पथकाने पोलिस ठाण्यात आणले. तेथे झालेल्या चौकशीत तो रशियातील अॅन्थोनी अॅन्टोएवीज (वय ३३) असल्याचे व पर्यटनासाठी गोवा-हरमल येथे राहत असल्याचे त्याने स्पष्ट केले.
तर विदेशी पर्यटकांसोबत असलेला कोलकत्ता येथील युवक अभिजीत दास असून, तोही पर्यटनासाठी गोव्यात आला होता. गोवा येथून वेेंगुर्लेतील पर्यटन स्थळे पाहण्यास ते दोघेही ओळख झाल्याने आले होते, अशी माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.
विदेशी पर्यटकांचे सध्या राहण्याचे ठिकाणी हरमल-गोवा व त्याचा पासपोर्ट आदींची पाहणी पोलिस ठाण्यामार्फत विदेशी पर्यटकाला नेऊन करण्यात आल्यानंतर वेंगुर्ले पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेऊन त्याची मुक्त्तता केली. (प्रतिनिधी)
वेंगुर्ले पोलिसांनी रशियन पर्यटकाला ताब्यात घेतले.