पुढील पाच वर्षात १७0 कोटी प्राप्त होणार

By Admin | Updated: June 17, 2016 00:21 IST2016-06-16T23:02:58+5:302016-06-17T00:21:23+5:30

संग्राम प्रभुगांवकर, शेखर सिंह : गावाचा आराखडा बनविताना लोकसहभागाची नितांत गरज

170 crore will be received in the next five years | पुढील पाच वर्षात १७0 कोटी प्राप्त होणार

पुढील पाच वर्षात १७0 कोटी प्राप्त होणार

सिंधुदुर्गनगरी : ‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत पुढील पाच वर्षांसाठी जिल्ह्याला १७० कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. ग्रामपंचायतींनी आपला विकास आराखडा तयार करताना आरोग्य, शिक्षण, दरडोई उत्पन्न वाढ यासाठी ३५ टक्के निधी खर्च करायचा आहे. गावातील गरजा काय आहेत याचा विचार करून बनवायच्या आराखड्यात लोकसहभागाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
१४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार आमचे गाव आमचा विकास उपक्रम राबविण्यात येत आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, महिला बालविकासचे प्रकल्प संचालक अनिल बागल उपस्थित होते.
१३ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ते, गटार अशा कामांवर प्रामुख्याने खर्च केला गेला. मात्र १४ व्या वित्त आयोगांतर्गत येणाऱ्या निधीचे सुव्यवस्थापन व्हावे यादृष्टीने शासनाने यातील ३५ टक्के निधी आरोग्य, शिक्षण, दरडोई उत्पन्न वाढविण्याची साधने यावर खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत.
या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला १७० कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. म्हणूनच त्याचे नियोजन ग्रामपंचायत स्तरावर अचूक होणे आवश्यक आहे. यादृष्टीने ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
१४ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०१६-१७ ते २०१९-२० या कालावधीतील प्रत्येक गटातील जास्त व कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या अनुदानाची माहितीही देण्यात आली आहे. सर्वात जास्त निधी फोंडाघाट ग्रामपंचायतीला १८ कोटी ९५ लाख रुपये तर सर्वात कमी ५ कोटी ७२ हजार रुपये निधी मालवण तालुक्यातील बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीला प्राप्त होणार आहे.
यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आराखडा हा लोकसहभागातून बनविणे आवश्यक आहे. हा आराखडा तयार होताना शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती, महिला, युवक, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था यांच्याशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती यांच्या संबंधातील कामे प्राधान्यक्रमानुसार कामे निवड करण्यात यावीत. यासाठी गण पातळीवर घेण्यात आलेले तज्ज्ञ प्रशिक्षक व अधिकारी यांच्या मदतीने लोकसहभागासाठी वातावरण निर्मिती प्रक्रिया अभियान स्वरूपात राबविण्यात येणार आहे. ‘आपले गाव आपला विकास’साठी प्रत्येक ग्रामस्थाने आपली व आपल्या गावाच्या विकासासाठी आवश्यक गोष्टींसाठी आग्रही रहावे व ग्रामपंचायतीने हा आराखडा १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत अंतिम मंजूर करून घ्यावा, असेही आवाहन यावेळी शेखर सिंह यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: 170 crore will be received in the next five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.