तीन कोटींच्या खर्चात १५३ विकासकामे मार्गी
By Admin | Updated: July 27, 2014 00:38 IST2014-07-27T00:33:46+5:302014-07-27T00:38:39+5:30
५0 कामे प्रगतीपथावर, २५ कामे प्रलंबित

तीन कोटींच्या खर्चात १५३ विकासकामे मार्गी
सिंधुदुर्गनगरी : आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघास २ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघासाठी मिळालेल्या एकूण ६ कोटी रुपयांच्या निधीपैकी मार्च २०१४ अखेर ३ कोटी २७ लाख ७८ हजार इतका खर्च झाला आहे. या खर्च झालेल्या निधीतून १५३ विकासकामे पूर्ण झाली आहेत तर २५ कामे अद्याप सुरु झालेली नाहीत.
स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून वितरीत केला जातो. यात प्रत्येक मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण व खडीकरण, वर्गखोल्या, पुलांची दुरुस्ती, समाजमंदिर बांधणे, व्यायामशाळा आदी विकास कार्यक्रमांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी २ याप्रमाणे ६ कोटी निधी प्राप्त झाला.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात मार्च २०१४ अखेर ३ कोटी २७ लाख ७८ हजार इतका निधी विकासकामांवर खर्च झाला आहे तर अद्यापही सुमारे २ कोटी ६२ लाख रुपये एवढा निधी खर्च होणे बाकी आहे.
मार्च २०१४ अखेर खर्च झालेल्या निधीतून १५३ विकासकामे पूर्ण झाली आहेत. एकूण तीनही विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदारांनी २३० विकासकामे सुचविली होती. त्यापैकी १५३ विकासकामे मार्च २०१४ अखेर पूर्ण झाली आहेत. दरम्यान, प्राप्त आमदार विकासनिधी जास्तीत जास्त खर्च करण्यास पालकमंत्री नारायण राणे हे आघाडीवर असून त्यांच्यापाठोपाठ आमदार दीपक केसरकर व आमदार प्रमोद जठार आहेत. (प्रतिनिधी)