शेतकऱ्यांना १५ कोटींची पीकविमा भरपाई जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:28 AM2020-10-06T11:28:54+5:302020-10-06T11:32:05+5:30

अनंत जाधव  सावंतवाडी : तालुक्यात गतवर्षी नुकसान झालेल्या आंबा, काजू फळपिकांची हवामानावर आधारित पीक विमा भरपाई शासनाकडून जमा करण्यात ...

15 crore crop insurance compensation to farmers | शेतकऱ्यांना १५ कोटींची पीकविमा भरपाई जमा

शेतकऱ्यांना १५ कोटींची पीकविमा भरपाई जमा

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना १५ कोटींची पीकविमा भरपाई जमासावंतवाडी तालुका : आंबा, काजू पिकांचा समावेश

अनंत जाधव 

सावंतवाडी : तालुक्यात गतवर्षी नुकसान झालेल्या आंबा, काजू फळपिकांची हवामानावर आधारित पीक विमा भरपाई शासनाकडून जमा करण्यात आली आहे. तालुक्यातील ११८७ शेतकऱ्यांची आंबा पिकाची सुमारे ८९७.१४ हेक्टरची ६ कोटी ७८ लाख ७२ हजार ६६६ रुपयांची तर काजू पिकाची ४१६ शेतकऱ्यांची ३२६.९६ हेक्टर क्षेत्राची ९ कोटी रुपयांची पीक विमा भरपाई रक्कम जमा करण्यात आली आहे.

तालुक्यात गेल्यावर्षी अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, हवामानात बदल, वादळी वारे यामुळे आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासन तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील बागायतदार तसेच आंबा, काजू लागवड करणारे शेतकरी यांचा खासगी विमा कंपनीकडून हवामानावर आधारित पीक विमा भरपाई योजनेनुसार पीक विमा काढला होता. अवेळी पाऊस, वादळी वारे यामुळे तालुक्यातील कलंबिस्त भागात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आंबा, काजू फळपिकांची नासधूस झाली होती.

हवामानावर आधारित आंबा पिकाची नुकसानी देताना १ जानेवारी ते ३१ मेपर्यंतच्या कालावधीत झालेली नुकसानी विचारात घेतली आहे. काजू पिकाची १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत झालेली नुकसानी विचारात घेतली आहे. मागील वर्षातील फळपीक विमा योजनेची सर्व नुकसानीची रक्कम यावर्षी प्राप्त झाली आहे.

रक्कम थेट खात्यात जमा होणार

आंबा व काजू फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे हवामानावर आधारित पीक विमा भरपाईमध्ये करून भरपाईचे प्रस्ताव विमा कंपनी तसेच शासनाला पाठविले होते. जवळपास वर्षानंतर सप्टेंबरमध्ये पीक विमा भरपाई जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. ही भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात आॅनलाईन बँकिंग पद्धतीने वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

३२६.९६ हेक्टर काजू पीक नुकसान

येथील कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यामुळे तालुक्यातील ११८७ शेतकऱ्यांच्या साधारणपणे ८९७.१४ हेक्टर क्षेत्राचे आंबा पिकाचे नुकसान झाले होते. तर ४१६ शेतकऱ्यांचे काजू पिकाचे ३२६.९६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या चालूवर्षीची आंबा व काजू फळपीक नुकसान भरपाई, पीक विमा योजनेबाबत पंचनामे तसेच प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती तालुका कृषी विभागाने दिली.

Web Title: 15 crore crop insurance compensation to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.