१४ गावे निर्मलग्रामपासून वंचित
By Admin | Updated: October 20, 2014 22:31 IST2014-10-20T21:09:25+5:302014-10-20T22:31:11+5:30
सदस्यांची नाराजी : मासिक सभेत माहिती उघड

१४ गावे निर्मलग्रामपासून वंचित
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात निर्मल ग्राम योजना योग्यप्रकारे राबविली जात नसल्याचा फटका कोलगावसह तालुक्यातील १४ गावांना बसला आहे. सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेवेळी ही माहिती पुढे आल्याने पंचायत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सावंतवाडी तालुक्यात एकूण ६३ गावांपैकी १४ गावे अद्यापही निर्मल ग्राम न झाल्याने सभापती प्रमोद सावंत यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. तर राज्य शासनाच्या तालुकास्तरीय खात्यातील खाते प्रमुखांनी सभेवर पाठ फिरविल्याने सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली.
पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती महेश सारंग, पंचायत समिती सदस्या नारायण राणे, स्वप्निल नाईक, श्वेता कोरगावकर, गौरी आरोंदेकर, अशोक दळवी, शुभांगी गावडे, सुनयना कासकर, वर्षा हरमलकर, राघोजी सावंत, एकनाथ नारोजी, गटविकास अधिकारी बी. बी. महाजन आदी उपस्थित होते.
या बैठकीत ग्रामपंचायत विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभापती प्रमोद सावंत यांच्या मतदार संघातील व उपसभापती महेश सारंग यांच्या कोलगावसह तालुक्यातील १४ गावे अद्यापही निर्मल ग्राम योजनेपासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. याबाबत सभापती सावंत यांनी संबंधितांना सुचना दिल्या व ही १४ गावे लवकरात लवकर निर्मल ग्राम व्हावी, याबाबत कार्यवाही करण्याचा आदेश दिला.
एकात्मिक बालविकास विभागांतर्गत सुरू असलेल्या अंगणवाड्यांना गेले दोन महिने पोषण आहार पुरविला गेला नसल्याची माहितीही उघडकीस आली. याबाबत वरिष्ठ पातळी स्तरावरून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सदस्यांना दिली.
सन २०११-१२ च्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींनी केलेल्या अतिरिक्त खर्चास सभागृहात मंजुरी देण्यात आली. २६ ग्रामपंचायतींना १० कोटी ५० लाखाचा मंजुरी देण्यात आली आहे. २८ आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत बेरोजगारांसाठी गावनिहाय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सभेच्या सुरुवातीला आंध्रप्रदेशातील हुडहुड वादळात शहीद झालेल्या माजगाव येथील शुभम सावंत यांना यावेळी सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात आली. (वार्ताहर)