‘गणपतीपुळे’त बुडताना ११ जणांना वाचवले
By Admin | Updated: July 20, 2015 00:07 IST2015-07-19T22:58:24+5:302015-07-20T00:07:04+5:30
दोघींचा समावेश : २४ तासांत दोन घटना

‘गणपतीपुळे’त बुडताना ११ जणांना वाचवले
गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडालेल्या वेगवेगळ्या दोन ग्रुपमधील सातजणांना वाचविण्यात यश आले असून, रविवारी दिवसभरात सुमारे अकराजणांना वाचवण्यात येथील स्थानिक तरुणांना यश आले आहे.
जोडून सुट्ट्या आल्यामुळे गणपतीपुळे येथे गर्दी झाली होती. त्यातच खवळलेला समुद्र व वाढलेले समुद्राचे पाणी यामुळे चौपाटीवर सुरक्षारक्षक समुद्रामध्ये आंघोळीसाठी जाऊ नये, असे सांगत असतानाच कैलास श्रीरंग खटावकर (वय ४६), सुवर्णा श्रीरंग खटावकर (३८), मानसी श्रीरंग खटावकर (१८) व प्रथमेश श्रीरंग खटावकर (१५) हे कुटुंब गणपतीपुळे पर्यटन निवासासमोर समुद्रामध्ये आंघोळ करीत होते.
मानसीला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडत असतानाच तिला वाचवण्यासाठी गेलेल्या श्रीरंग खटावकर व सुवर्णा खटावकर हेही बुडू लागले. मात्र यावेळीच आरडाओरडा झाल्याने समुद्राच्या काठावर व्यवसाय करणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ धाव घेत या तिघांनाही सुखरूप बाहेर काढले.
त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडून काही मिनीटे होतात न होतात तोपर्यंत गणपतीपुळे मंदिराजवळ समुद्राच्या पाण्यात अहमदनगर येथून सहलीसाठी आलेल्या अनिल बी. दौंड (३६), जयराज घाघ (२२), सचिन नेटे (२३), विनायक दहिरे (२२) हे आंघोळीसाठी समुद्रामध्ये उतरले. विनायकला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. सचिन व जयराज यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र विनायकचा हात सुटला. त्यावेळेस तेथील व्यावसायिकांनी दोरी व रिंगच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले. या दोन्ही घटनांमधील सुमारे ११जणांना वाचवण्यासाठी येथील स्थानिक व्यावसायिक सूरज पवार, विश्वास सांबरे, मिलींद माने यांना यश आले. (वार्ताहर)