सागरी पर्यटनासाठी १0२ कोटी मंजूर
By Admin | Updated: November 21, 2015 23:58 IST2015-11-21T23:04:47+5:302015-11-21T23:58:03+5:30
दीपक केसरकर : जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध

सागरी पर्यटनासाठी १0२ कोटी मंजूर
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या सागरी पर्यटनासाठी विविध सागरी किनाऱ्यांच्या आधुनिकीकरणासाठी १०२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्गचा विकास हा झालाच पाहिजे. पर्यटनाचा विकास होताना जिल्ह्याच्या सर्व भागाचा समतोल विकास व्हावा या मताचा मी असून, विकास कुणाच्या मतदारसंघात आहे हे गृहीत धरणार नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही विरोधकांना पालकमंत्र्यांनी लगावला.
ओरोस येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय भोगटे, प्रकाश परब, सचिन सावंत, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याच्या सागरी पर्यटनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये विजयदुर्गसाठी १२ कोटी ७३ लाख, देवगडसाठी १३ कोटी ४६ लाख, तारकर्ली, तोंडवली, निवतीसाठी ३५ कोटी ७७ लाख, शिरोडा सागरेश्वर, मोचेमाडसाठी ४ कोटी ६६ लाख निधी मंजूर करण्यात आला. हा निधी संबंधित ठिकाणी लँड स्कोपिंग, स्ट्रीट बीच लाईट, हाऊसबोट, किल्ल्यांचे नूतनीकरण, कॉटेजीस उभे करणे, खाडीतील गाळ काढण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
भंगसाळ नदीचा गाळ जलयुक्त शिवारमधून काढणार
कुडाळ येथील भंगसाळ नदीचा गाळ जलयुक्त शिवारमधून काढला जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले. हा गाळ काढावा यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी उपोषण केले होते. त्याची दखल घेत जलयुक्त शिवार योजनेमधून गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. पुढील आर्थिक वर्षात यावर तरतूद करण्यात येणार आहे.