स्वाईन फ्ल्यूचे संशयित १0 रुग्ण
By Admin | Updated: February 27, 2015 23:18 IST2015-02-27T22:47:44+5:302015-02-27T23:18:40+5:30
गुरुनाथ पेडणेकर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभेत गौप्यस्फोट

स्वाईन फ्ल्यूचे संशयित १0 रुग्ण
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आता (प्रत्येक केंद्रात) सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. तसेच संगणकही देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी दिली. तसेच सध्या राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्ल्यूचे सिंधुदुर्गात संशयित १० रूग्ण आढळले असल्याचा गौप्यस्फोट करीत आरोग्य विभागाने हे सर्व रूग्ण पुढील उपचारासाठी हलविले असल्याची माहिती देत ते स्वाईन फ्ल्यू पॉझिटीव्ह नसल्याचे अहवालही प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.जिल्हा परिषदेची आरोग्य विभागाची सभा सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात गुरुवारी झाली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, रेश्मा जोशी, कल्पिता मुंज, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आता लवकरच प्रत्येक एक याप्रमाणे संगणक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मधुमेह तपासणी मशीनही देण्यात येणार असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.देशासह राज्यात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले असून याचे सुमारे १०० रूग्ण दगावले आहेत. सिंधुदुर्गात या तापाचे १० संशयित रूग्ण आढळले होते. त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यांची त्या ठिकाणी तपासणी केली असता त्यातील एकाही रूग्णाला स्वाईन फ्ल्यूची बाधा झाली नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. असे असले तरी किरकोळ स्वरूपाचा जरी ताप आला तरी तत्काळ नजिकच्या रूग्णालयात तपासणी करावी, असे आवाहनही जिल्हावासियांना सभापती पेडणेकर यांनी केले आहे.जिल्ह्यातील चार रूग्णांलयांमध्ये राजीवगांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार सुरू आहेत. यात जिल्हा रूग्णालयात विविध प्रकारचे २२ आजारांवरील उपचार, नागवेकर हॉस्पिटलमध्ये १२, गुरूकृपा हॉस्पिटलमध्ये १२ व सावंतवाडी येथील संजीवनी बालरूग्णालयामध्ये अशाप्रकारे उपचार सुरू असल्याची माहिती समन्वयक डॉ. अविनाश पाटील यांनी दिली.या योजनेची प्रसिद्धी गावागावात करून जनजागृती निर्माण करा, अशा सूचना सभापती पेडणेकर यांनी दिल्या. (प्रतिनिधी)