‘झेडपी’ अध्यक्षांच्या दालनातच हमरीतुमरी!
By Admin | Updated: October 6, 2015 23:47 IST2015-10-06T21:45:08+5:302015-10-06T23:47:05+5:30
कोरेगाव ग्रामसेवक निवड : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून दबाव येत असल्याचा संघटनेचा आरोप--जिल्हा परिषदेतून...

‘झेडपी’ अध्यक्षांच्या दालनातच हमरीतुमरी!
सातारा : कोरेगाव ग्रामपंचायतीला कायमस्वरुपी ग्रामसेवक मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात भलतीच खल झाली. कोरेगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामसेवक संघटना यांच्यात हमरीतुमरी झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी मध्यस्थी करुन कोरेगावला ग्रामसेवकाची निवड करत असल्याचे जाहीर केले.
कोरेगाव ग्रामपंचायतीत कार्यरत असताना ग्रामविकास अधिकारी नंदकुमार जगताप यांचा मृत्यू झाला होता. यानंतर हे पद रिक्त राहिले होते. ग्रामसेवक नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. ग्रामपंचायतीचे नियोजन कोलमडले आहे, त्यामुळे या रिक्त पद भरावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र, कोरेगावात काम करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने एकही ग्रामसेवक याठिकाणी जायला तयार नसल्याचे ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे आहे.
या विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या दालनात मंगळवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आनंद भंडारी तसेच ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरेगाव ग्रामपंचायतीला कायमस्वरुपी ग्रामसेवक देण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली. तर कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये जाणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला त्रास सहन करावा लागतो, कायमच पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करावे लागते, त्यामुळे कुठलाही ग्रामविकास अधिकारी याठिकाणी जायला तयार नसल्याचे ग्रामसेवक संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
याउलट ग्रामपंचायतीच्या दफ्तराची तपासणी करण्याची मागणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली. या आरोप-प्रत्यारोपांवरुन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक संघटना यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सुमारे दोन तास हा खल सुरु होता.
सोनवलकर व भंडारी या दोघांनी मिळून या वादाबाबत तोडगा काढला. ग्रामपंचायतीसाठी तात्पुरता ग्रामविकास अधिकारी नेमण्यात आला आहे. त्यानंतर हा खल थांबला. (प्रतिनिधी)
कोरेगाव ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक संघटना या दोघांचेही म्हणणे ऐकूण घेऊन आम्ही निर्णय घेतला. ग्रामपंचायतीचे काम सुरु राहणे गरजेचे आहे.
- माणिकराव सोनवलकर,
अध्यक्ष, जिल्हा परिषद
कोरेगाव ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी झालेल्या चर्चेनंतर ग्रामविकास अधिकाऱ्याची आॅर्डर काढली आहे.
- आनंद भंडारी,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत