जिल्हा परिषद इच्छुकांनी ‘देव ठेवले पाण्यात!’
By Admin | Updated: June 7, 2016 07:33 IST2016-06-06T23:34:59+5:302016-06-07T07:33:24+5:30
बुध मतदारसंघ : कोण फायद्यात... कोण तोट्यात याचीच चर्चा

जिल्हा परिषद इच्छुकांनी ‘देव ठेवले पाण्यात!’
बुध : खटाव तालुक्यातील उत्तरेकडील बुध जिल्हा परिषद गटाची सद्याची रचना सातारा जिल्ह्यात सर्वात विचित्र आहे़ मोळ - मांजरवाडीपासून विसापूर- रेवलकरवाडी असा भला मोठा विस्तार असलेल्या बुध झेडपी गटाची आता पुनर्रचना होणार असल्याने ही गट आणि गण पुनर्रचना कोणाच्या फायद्याची तर कोणाच्या नुकसानाची होणार याची चर्चा मतदारांच्यात असून, अनेक इच्छुकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहे.बुध जिल्हा परिषद गटात मागील दहा वर्षांपासून ललगुण गावचे काँग्रेस नेते मानाजीकाका यांचे वर्चस्व आहे़ तर त्यांच्या पत्नी विद्यमान सदस्या आहेत़ बुध जिल्हा परिषद गटाची विचित्र रचना आहे़ बुध गावापासून दोन-चार कि.मी वर असलेले वेटणे, रणशिंगवाडी ही मोठी गावे असूनही ती खटाव जिल्हा परिषद गटात येतात तर विसापूर, रेवलकरवाडी ही अगदी विरुद्ध दिशेला असूनही या बुध गटात समाविष्ट असल्याने या गटावर वर्चस्व मिळवण्यासाठी विसापूर आणि बुध असे दोन टोक तयार होत आहेत़ बुध गटात डिस्कळ आणि बुध असे दोन पंचायत समितीचे गण असून, कशा पद्धतीने गणाची फोड होत आहे, यावरच इच्छुकांची भवितव्य अवलंबून आहे़ राजापूर, गारवडी आणि ललगुण ही गावे काँगे्रस ग्रामपंचायतीचे आहेत तर या बुध गटात राष्ट्रवादीचे मोठे वर्चस्व असूनही गटातटाच्या राजकारणात राष्ट्रवादी मागे पडत असल्याचे चित्र आहे़ ललगुणचे कैलास घाडगे, विसापूरचे हरी साळुंखे तर डिस्कळचे प्रदीप गोडसे हे आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक; पण एकी नसल्याने आजवर त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांच्यातील दुहीचा मोठा फायदा मानाजीकाका घाडगे हे उठवत आहेत़
यावेळी बुध झेडपी गट पुनर्ररचनेत जर विसापूर, रेवलकरवाडी आदी परिसरातील गावे या गटातून वगळून पुसेगाव गटाला जोडण्याची शक्यता आहे जर असे झाले तर पुसेगाव गणातील रणशिंगवाडी आणि वेटणे ही गावे बुध जिप गटाला जोडली जातील़ पुसेगाव सुद्धा पंचायत समितीचा गण आहे; पण भविष्यात पुसेगाव गट तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)
इच्छुकांची रेलचेल
काँगे्रसमधून मानाजीकाका घाडगे, बुधचे अशोकराव पुरे, पांगरखेलचे अमित जगताप याशिवाय गारवडीचे सरपंच शेडगे तर शिवसेनतून वर्धनगडचे सरपंच आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अर्जुन मोहिते यांचे एकमेव नाव आघाडीवरती आहे, तर भाजपाचे मेघराज निकम यांनीही जोरदार तयारी केली. त्यामुळे इच्छुकांनी बुध झेडपी गट पुनर्रचना कधी होते, याकडे डोळे लावले आहेत.
सुंठे वाचून खोकला जाणार का?
बुध झेडपी गटात विसापूरचे सरपंच सागर साळुंखे यांचा वारू चौफेर उधळत आहे़ त्यामुळे डिस्कळ, ललगुण मधील राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक प्रदीप गोडसे आणि कैलास घाडगे यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. जर विसापूर व परिसरातील गावे बुध गटातून वगळली तर सुंठे वाचून खोकला जाणार आहे, त्यामुळे विसापूर या गटातून वगळावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
आरक्षणवर अनेकांची भिस्त
बुध जिप गटावर आरक्षण कसे पडते यावरच अनेकांची भिस्त आहे़ ओबिसी आरक्षण पडले तर प्रल्हाद चव्हाण आणि अशोक पुरे यांची रणनीती ठरणार आहे कारण राजपूर, बुध या भागांत ओबीसी समाजाची एक गठ्ठा मताचा आकडा लक्षणीय आहे़