झेडपीत खुर्ची सुनीसुनी... अन् सहकारी सुन्न!

By Admin | Updated: March 16, 2015 23:40 IST2015-03-16T23:40:16+5:302015-03-16T23:40:16+5:30

दोन कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू : अकराही विभागातील कर्मचाऱ्यांनी शोकसभेतून आठवणींना दिला उजाळा

Zeebuddin chair Sunsuni ... and cooperative numb! | झेडपीत खुर्ची सुनीसुनी... अन् सहकारी सुन्न!

झेडपीत खुर्ची सुनीसुनी... अन् सहकारी सुन्न!

सातारा : स्थळ : जिल्हा परिषद... वार सोमवार आठवड्याचा पहिला वार... विविध कामांसाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून ग्रामस्थांची वर्दळ सुरू... पण दुसऱ्या मजल्यावर आरोग्य विभागातील तांत्रिक विभाग शांत होता. कोण कोणाशी बोलत नव्हतं... पण कामही करत नव्हतं. कारण त्यांची काळजी घेणारे ‘भोसले रावसाहेब’ त्यांच्यातून निघून गेले होते. त्यांच्या खुर्ची अन् टेबलजवळ कोणीच फिरकलं नाही. कोणाचंच कामात लक्ष लागत नव्हतं.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वेळे हद्दीत शनिवारी झालेल्या भीषण कार अपघात जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, आरोग्य सहायक नितीन भोसले अन् संघटनेचे सदस्य महेश वाघमारे यांचा मृत्यू झाला. संघटनेचे अध्यक्ष दिवंगत भोसले हे गेली वीस वर्षे आरोग्य विभागात काम करत आहेत. त्यांच्याकडे सध्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना, उत्कृष्ठ आरोग्य कर्मचारी-अधिकारी विभागाची जबाबदारी सांभाळत होते. पण तत्पूर्वी त्यांच्याकडे वैद्यकीय बिलांचा विभाग होता. त्यामुळे त्यांच्यांशी प्रत्येक कर्मचाऱ्यांचा संबंध येत होता.भोसले व वाघमारे यांच्या गाडीला अपघात झाल्याचे समजल्यानंतर शनिवारी रात्रभर जिल्हा परिषदेतील असंख्य कर्मचारी जिल्हा रुग्णालयात गेले होते. महेश वाघमारे यांचा सोमवारी सावडणे विधी होता. त्यामुळे आरोग्य विभागातील सर्वच कर्मचारी सकाळी संगम माहुलीला गेले होते. तेथून ते जिल्हा परिषदेत कामावर आले. पण कोणाचेच कामात लक्ष लागत नव्हते. त्यामुळे अनेक कर्मचारी बायोमेट्रीकवर हजेरी लावून पुन्हा आवारात एकत्र आले. तांत्रिक विभागात सोळा कर्मचारी काम करतात, पण एकानेही सोमवारी डबा आणला नव्हता की जेवायला घरी गेले नाही. कोणत्या कर्मचाऱ्यावर अन्याय होतोय, त्यांच्या अडचणी आहेत, असे वाटले की भोसले अन् वाघमारे दोघेही धावून जात. भांडणे त्यांचा स्वभाव नसला तरी कसलाही बाका प्रसंग असला तरी ते स्वत: पुढाकार घेत अन् चर्चेतून तोडगा काढून प्रसंगावर पडदा टाकण्याची त्यांची हातोटी होती. त्यामुळेच त्यांच्याकडे भेटायला येणारे सहकारी धडक टेबल क्रमांक चारकडे जात पण, सोमवारी या टेबलकडे कोणी फिरकलेही नाही.जिल्हा परिषदेतील कामाची वेळ सकाळी दहाला सुरूवात होते. त्यामुळे बायोमॅट्रिक मशिनजवळ ‘थंब’ करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची रांगा लागलेल्या असतात. मात्र, भोसले दररोज साडेनऊ ते पावणेदहाच्या वेळेतच येत असत. मशिनवर थंब करुन येणाऱ्या सहकार्याशी चर्चा करणे, वेगळेपण जाणून घेण्यात ते दंग असत. कोणाचे नातेवाईक आजारी असतील तर रुग्णालयात जाऊन विचारपूस करत तसेच लग्न कार्यातही सहभागी होत. हे कर्मचारी विसरले नाहीत.
दरम्यान, नितीन माने, महेश वाघमारे यांच्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास शोकसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, सेवक संघटनेच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)


मी बसतो तेथून सर्वच कर्मचारी दिसतात. पण, सोमवारी सकाळपासून माझं लक्ष फक्त टेबल क्रमांक चारकडंच जातंय. ते आपल्यातून गेलेत हे मानायला मन तयारच होत नाहीय. या विभागात विविध कामानिमित्ताने त्यांच्याकडे येत असलेले लोक माझ्याकडे त्यांच्याविषयी विचारणा करतात, तेव्हा काय सांगायचे हेच कळत नाही.
- स्वप्नील चव्हाण
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी.

गुणवंतांची निवड राहूनच गेली
नितीन भोसले यांच्याकडे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेबरोबरच उत्कृष्ट आरोग्य कर्मचारी अधिकारी या विभागाचीही जबाबदारी होती. ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन आहे. यादिवशी उत्कृष्ट आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार होता. यासाठी कर्मचारी निवडण्यासाठी भोसले यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता बैठक बोलाविली होती. मार्चअखेरमुळे उद्दिष्टपूर्ती झाली की नाही, याचाही आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी येणार होते. मात्र, भोसले त्यांच्यातून निघून गेल्याने गुणवंत कर्मचाऱ्यांची निवड करणं राहूनच गेलं.

Web Title: Zeebuddin chair Sunsuni ... and cooperative numb!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.