सातारच्या हद्दवाढीला झेडपीचा हिरवा कंदील
By Admin | Updated: December 2, 2014 23:29 IST2014-12-02T22:16:26+5:302014-12-02T23:29:33+5:30
शिवेंद्रराजे पालिकेत : ‘क्रीडाई’ने रस्त्यांचे सुशोभीकरण करावे

सातारच्या हद्दवाढीला झेडपीचा हिरवा कंदील
सातारा : शहरातील प्रमुख तीन रस्त्यांवरील रस्तादुभाजकात वृक्षारोपण, सुशोभीकरण व देखभालीची जबाबदारी ‘क्रीडाई’ने घ्यावी. त्याबदल्यात त्यांनी या जागेत जाहिराती लावून खर्चाचा ताळमेळ बसवावा. त्याचबरोबर राजपथाच्या स्वच्छतेसाठी या रस्त्यावर बसविण्यात येणाऱ्या प्लास्टिक बकेटची जबाबदारी घ्यावी, असा प्रस्ताव आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी ‘क्रीडाई’च्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत ठेवला. या प्रस्तावाला पदाधिकाऱ्यांनी तत्वता मान्यता दिली.
बांधकामङ्कव्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी कामङ्ककरणाऱ्या ‘क्रीडाई’ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक घेण्यात आली. ‘कालिदास पंप ते सदर बझार, पोवई नाका ते विसावा नाका तसेच राजपथावर रयत शिक्षण संस्थेसमोरील दुभाजकावर वृक्षारोपण करुन सुशोभीकरण करावे. तसेच त्याच्या देखभालीचीही जबाबदारी स्वीकारावी. त्या मोबदल्यात संघटनेने जाहिराती करून येणाऱ्या खर्चाचा ताळमेळ बसावावा,’ असा प्रस्ताव आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी ठेवला. ‘क्रीडाई’च्या पदाधिकाऱ्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर राजपथाच्या स्वच्छतेसाठी या रस्त्यावर ठिकठिकाणी प्रायोजकामार्फत प्लास्टिक बकेट बसविण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली. शहरातील काही ‘आयलँड’ प्रायोजकामार्फत विकसित करण्याबाबतही संघटनेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली.
पालिकेच्या सहकार्याने शहरात घराघरांमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव ‘क्रीडाई’ने मुख्याधिकाऱ्यांपुढे ठेवला.
शहराचा विकास होण्यासंदर्भात डेव्हलपमेंट प्लॅनमधील दाखल केलेल्या रस्त्यांचा ताबा घेणे व त्यांचा विकास करावा. पालिकेची हद्दवाढ मंजुरीच्या प्रस्तावास गती द्यावी. शहरासाठी अग्निशमन दल कार्यालय सुरू करावे. पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी. नळ कनेक्शनसाठी वारंवार रस्ता खोदावा लागू नये, यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जलवाहिन्या टाकाव्यात आदी मागण्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.
नगराध्यक्ष सचिन सारस, नगररचनाकार प्रशांत राजे, माजी नगरसेवक नासीर शेख तसेच ‘क्रीडाई’चे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, उपाध्यक्ष अॅड. कमलेश पिसाळ, सचिव सुधीर शिंंदे, सुधीर ठोके, मंगेश वाडेकर, राहुल वखारिया, सुधीर घारगे, जयंत ठक्कर, उपेंद्र पंडित, अभिजित पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आता चेंडू शासनाकडे...
शहराचा विस्तार होत असताना पालिकेची हद्द मर्यादित राहिल्याने नागरी गैरसोर्इंसह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी हद्दवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेने हिरवा कंदील दाखवला आहे. शासनाकडून त्याला लवकरच मंजुरी मिळेल, असे सांगितले.