झकास रस्त्याच्या कडेला चूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:14 IST2021-02-18T05:14:04+5:302021-02-18T05:14:04+5:30
साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर चकाचक डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला दगडाचा चुरा पडलेला असल्याने ...

झकास रस्त्याच्या कडेला चूर
साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर चकाचक डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला दगडाचा चुरा पडलेला असल्याने सुसाट दुचाकी गाड्या घसरून पडत आहेत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. (छाया : १७जावेद०९)
----------------------
कचरा जाळल्याने धूर
सातारा : साताऱ्यातील ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यात प्लास्टिक पिशव्या असून, तो कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरून तेथून जावे लागत असते.
----------------------अन्नासाठी भटकंती
सातारा : यवतेश्वर, अजिंक्यतारा, चारभिंत परिसरात वनवा लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक झाली आहे. जंगलातील वानरांना खाण्यासाठी फळे मिळत नाहीत. अन्नाच्या शोधात त्यांना भटकंती करावी लागत आहे. अनेक प्राणी अन्नाच्या शोधात शहरात येत असून, घरात घुसून नुकसान करीत आहेत.
-------------------------
स्ट्रॉबेरी अजूनही तुरटच
सातारा : महाबळेश्वर, पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढले आहे. तरीही स्ट्रॉबेरीचे दर अजूनही तेजीत आहेत. सर्वसाधारणपणे चारशे ते पाचशे रुपये किलो दराने स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अजूनही स्ट्रॉबेरी घेऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी स्ट्रॉबेरी अजूनही तुरटच आहे.
-----------------------------
किल्ल्यावर वृक्षतोड
सातारा : साताऱ्यातील अजिंक्यतारा परिसरातील डोंगरावर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात आहे. अनेक जण या परिसरात येऊन झाडांच्या फांद्या तोडतात अन् पडल्यानंतर वाळल्यावर त्या उचलून नेतात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे.
------------------------------कलिंगड स्वस्त
सातारा : साताऱ्यातील बाजारपेठेत कलिंगडाची आवक वाढली असून, त्याचे दरही कमी झाले आहेत. सरासरी दहा, वीस ते तीस रुपयांना एक कलिंगड मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांतून त्याला मागणी वाढत आहे. उन्हाची चाहूल लागली असून, उन्हाळ्यात कलिंगड शरीरासाठी हितावह असते.
------------------------
द्राक्ष महागल्याने मागणीमध्ये घट
सातारा : द्राक्षांचा हंगाम अजूनही काही दिवस असून, सर्वसाधारणपणे महाशिवरात्रीपर्यंत द्राक्ष बाजारात येतात. मात्र, साताऱ्यातील बाजारपेठेत द्राक्षांची आवक मंदावली आहे. त्यामुळे दरही तेजीत आहेत. शंभर, एकशे वीस रुपये किलो दराने विक्री सुरू असल्याने त्यांची मागणीही घटली आहे.
--------------------
खेळाचे साहित्य नाही
सातारा : साताऱ्यातील अनेक शाळांमध्ये खेळ पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र, मुलांकडे संबंधित खेळाचे साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे खेळाचे साहित्य आणण्याबाबत पालकांकडे तगादा लावला जात आहे. हे साहित्य सहज मिळत नसल्याने पालकांना भटकंती करावी लागत आहे.
--------------------------------
टोप्यांना मागणी
सातारा : सातारासह परिसरात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना उन्हातून प्रवास करणे अवघड जात आहे. साहजिकच टोप्यांना मागणी वाढत आहे. बाजारपेठेत विविध आकारांतील टोप्या दाखल झाल्या आहेत. त्यांना मागणी वाढत असून, दरही सर्वसाधारण आहेत.
-------------------------
फॅन्सी नंबर प्लेट
सातारा : सातारा शहर परिसरातील पोलिसांकडून फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाई केली जाते. तरीही अनेक जण फॅन्सी नंबर प्लेट लावत आहेत. त्यातून सहजपणे नंबर लक्षात येत नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
-------------------------बंदिस्त गटार योजना
सातारा : वाई तालुक्यातील भुईंजच्या बेघरवस्तीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने बंदिस्त गटार योजना लागू केली आहे. यासाठी जमिनीत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे भविष्यात रोगराई कमी होण्यास, तसेच डासांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
-----------------------------पथदिवे बंदच
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी असलेल्या उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्याठिकाणी चांगली सोय होत असून, इतर ठिकाणचे पथदिवे मात्र बंदच आहेत. त्यामुळे अंधार असतो. दुचाकीस्वारांना यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पथदिवे लावावेत, अशी मागणी केली जात आहे.