शिकारीला गेलेल्या युवकाचा खून
By Admin | Updated: January 9, 2017 04:18 IST2017-01-09T04:18:28+5:302017-01-09T04:18:28+5:30
शिकारीला गेलेल्या युवकाचा गोळी घालून खून करण्यात आल्याची घटना येणपे (ता. कऱ्हाड) येथे शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.

शिकारीला गेलेल्या युवकाचा खून
कऱ्हाड (जि. सातारा) : शिकारीला गेलेल्या युवकाचा गोळी घालून खून करण्यात आल्याची घटना येणपे (ता. कऱ्हाड) येथे शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कऱ्हाड पंचायत समितीच्या माजी सभापतीला पोलिसांनी अटक केली आहे.
कमलेश लक्ष्मण पाटील (२१, रा. येणपे) असे मृताचे, तर किसन विष्णू जाधव (७५) अटकेतील संशयिताचे नाव आहे. दरम्यान, शिकारीला गेले असताना बारा बोअरच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने कमलेशचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र गोळी चुकून लागली की मुद्दाम झाडली, हे तपासाअंती स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
येणपे येथील किसन जाधव व अजित आकाराम जाधव शनिवारी रात्री सातच्या सुमारास गावाजवळच्या सुतारकी शिवारात शिकारीसाठी निघाले होते. कमलेशही त्यांच्यासोबत गेला होता. रात्री उशिरा कमलेशला गोळी लागल्याची माहिती मिळाली.
पोलिसांना घटनास्थळी छातीत गोळी लागून कमलेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. कमलेश सायंकाळी किसनसोबत शिकारीला गेल्याचे तसेच त्याच्याकडे बारा बोअरची परवानाधारक बंदूक असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी किसनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चुकून सुटलेली गोळी कमलेशला लागली. (प्रतिनिधी)