गोळ्या घालून युवकाचा खून

By Admin | Updated: June 10, 2014 02:13 IST2014-06-10T01:43:20+5:302014-06-10T02:13:42+5:30

कऱ्हाडनजीक भरवस्तीत घटना : हल्लेखोरांच्या सॅकमध्ये आढळली पिस्तुले, कोयता

Youth's blood after shooting | गोळ्या घालून युवकाचा खून

गोळ्या घालून युवकाचा खून

कऱ्हाड : शहरानजीकच्या जखीणवाडीत मयूर गोरे या पिग्मी एजंट युवकाचा पाठलाग करत मारेकऱ्यांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून व डोक्यात खोरे घालून निर्घृण खून केला. आज, सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मृत युवकाच्या मावस भावावरही त्या मारेकऱ्यांनी हल्ला केला होता. मात्र, तो नजीकच्या उसाच्या शेतात पळून गेल्याने बचावला. खुनानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. मयूर मोहन गोरे (वय २५, रा. पंताचा कोट, सोमवार पेठ, कऱ्हाड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयूर गोरे एका बँकेसाठी पिग्मी गोळा करण्याचे काम करीत होता. मयूरच्या मोबाईलवर आज सकाळी अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ‘आम्हाला पिग्मीचे खाते उघडायचे आहे,’ असे सांगून संबंधित व्यक्तीने मयूरला भेटण्यासाठी मलकापूरला बोलवले. दुपारी दीडच्या सुमारास मावस भाऊ सिद्धार्थ पवारला घेऊन मयूर दुचाकीवरून मलकापूरला गेला. मलकापुरात वास्तव्यास असलेल्या मावशीकडे जेवण केल्यानंतर दोघेही दुचाकीवरून महामार्गावर मलकापूर फाटा येथे गेले. तेथून मयूरने संबंधित क्रमांकाला फोन करून ‘भेटायला कोठे यायचे,’ याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्या व्यक्तीने जखिणवाडी रस्त्याला येण्यास सांगितले.
मयूर व सिद्धार्थ दुचाकीवरून जखीणवाडी रस्त्याला काही अंतरापर्यंत गेले. त्यावेळी रस्त्यावरच लोकवस्तीनजीक दोन युवक दुचाकीवर थांबले होते. मयूर व सिद्धार्थने त्या युवकांना ‘तुम्हीच फोन केला होता का,’ अशी विचारणा केली. ‘आम्हीच’ फोन केल्याचे सांगून, त्या दोघांनी मयूर व सिद्धार्थला पाणंद रस्त्याने डोंगराच्या दिशेने नेले. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी दोघांना थांबविले. तोपर्यंत अन्य दोन युवक दुचाकीवरून तेथे आले. संबंधित चौघांमधील एकाने ‘हाच का मयूर,’ अशी विचारणा केली. दुसऱ्याने होकार दिल्यानंतर त्याने आपल्यासोबत आणलेल्या सॅकमधून धारदार कोयता काढून मयूरवर वार केला. तो वार मयूरने हातावर झेलला. त्यानंतर घाबरलेले मयूर व सिद्धार्थ तेथून पळाले. सिद्धार्थ उसाच्या शेतात तर मयूर रस्त्याकडे धावला. त्यावेळी हल्लेखोरांपैकी एकाने सॅकमधील पिस्तूल काढून मयूरच्या दिशेने पहिली गोळी झाडली. मात्र, ती मयूरला लागली नाही. मयूर रस्त्याकडे पळत असताना हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. रस्त्यावर लोकवस्तीत पोहोचल्यानंतर मयूर एका घराच्या दिशेने धावला. मात्र, उंबऱ्यातच तो कोसळला. त्यावेळी हल्लेखोरांनी लाकडी दांडके व खोऱ्याने त्याला मारहाण केली. तसेच त्यांनी मयूरवर दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी मयूरच्या चेहऱ्याला लागली. या हल्ल्यात मयूरचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांना हल्लेखोरांची सॅक सापडली असून, त्यामध्ये दोन पिस्तुले व कोयता आढळून आला आहे.
याबाबतची नोंद रात्री उशिरा कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Youth's blood after shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.