जलाशयाच्या काठावर तरुणांची हुल्लडबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:05+5:302021-02-05T09:17:05+5:30
तरुणांची हुल्लडबाजी पेट्री : लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने कास, बामणोली या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...

जलाशयाच्या काठावर तरुणांची हुल्लडबाजी
तरुणांची हुल्लडबाजी
पेट्री : लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने कास, बामणोली या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. बहुतांश पर्यटक बामणोली येथे नौकाविहाराला पसंती देत आहेत, तर काही तरुण जलाशयाच्या पाण्यात हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. कास तलाव परिसरातही अशीच परिस्थिती असून, तरुणाई सांडव्यावर उभे राहून फोटोसेशन करताना दिसत आहे. पोलिसांची गस्त घालून हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
व्हॉल्व्हची गळती;
निघता निघेना
सातारा : सातारा पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराजवळ एका व्हॉल्व्हला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. दररोज सायंकाळी सहानंतर या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. हा व्हॉल्व्ह भर रस्त्यात असल्याने याचा वाहतुकीलादेखील अडथळा निर्माण होत आहे. शनिवार पेठ, शाहू चौक, देवी चौक येथील व्हॉल्व्हलाही मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. पालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
केळघर घाटात
वाहनधारकांची कसरत
मेढा : मेढा-महाबळेश्वर मार्गावर असलेल्या केळघर घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मातीचे ढीग तसेच आहे. काही ठिकाणी खडी रस्त्यावर आल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. महाबळेश्वरला जोडणारा जवळचा रस्ता असल्याने अनेक पर्यटक मेढा घाटातून महाबळेश्वरकडे मार्गस्थ होतात. मात्र, हा रस्ता वाहतुकीयोग्य नसल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.