तरुणांची हुल्लडबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:37 IST2021-03-24T04:37:32+5:302021-03-24T04:37:32+5:30

पेट्री : कास, बामणोली या पर्यटनस्थळांना पर्यटक अधूनमधून भेट देत आहेत. बहुतांश पर्यटक बामणोली येथे नौकाविहाराला पसंती देत ...

Youth riots | तरुणांची हुल्लडबाजी

तरुणांची हुल्लडबाजी

पेट्री : कास, बामणोली या पर्यटनस्थळांना पर्यटक अधूनमधून भेट देत आहेत. बहुतांश पर्यटक बामणोली येथे नौकाविहाराला पसंती देत आहेत. तर काही तरुण जलाशयाच्या पाण्यात हुल्लडबाजी करताना दिसून येत आहेत. कास तलाव परिसरातही अशीच परिस्थिती आहे. पोलिसांची गस्त घालून हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

व्हॉल्व्हची गळती

सातारा : शहरातील गुरुवार बागेजवळ रस्त्याकडेला असलेल्या एका व्हॉल्व्हला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. दररोज सायंकाळी ६ नंतर या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेऊन पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

वाहनधारकांची कसरत

कुडाळ : मेढा-महाबळेश्वर मार्गावर असलेल्या केळघर घाटातील समस्यांचे ग्रहण काही केल्या सुटेना. या घाटरस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्ता जागोजागी खोदण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मातीचे ढीग तसेच आहे. काही ठिकाणी खडी रस्त्यावर आल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

ओढ्यावरील संरक्षक

भिंतीचे काम पूर्ण

सातारा : माची पेठेतील शंकराचार्य मठाजवळील नैसर्गिक ओढ्यावर उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे घाणीने गजबजणारा ओढा आता कचरामुक्त झाला आहे. मात्र, या भिंतीच्या बाहेरच पुन्हा मातीचे ढिगारे टाकण्यात आले असून, ही माती पुन्हा ओढ्यात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

वाहतूक कोंडी

सातारा : शहरातील तांदूळआळी, चांदणी चौक व खणआळी या परिसरात वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक खासगी तसेच मालवाहतूक करणारी वाहने रस्त्याकडेला लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. पोलिसांच्या वाहतूक शाखेने अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

बंदोबस्ताची मागणी

सातारा : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी उपद्रव घातला असून, नारिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणा-या पादचा-यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. माची पेठ, राधिका रोड व बसस्थानक परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे.

केळींनी गाठली चाळिसी

सातारा : गेल्या महिनाभरापासून २० ते ३० रुपये डझन या दराने विकली जाणारी केळी आता ४० रुपयांवर गेली आहेत. बाजारपेठेत मंगळवारी उत्तम प्रतीची केळी ४० तर कमी प्रतीची केळी ३० रुपये डझनाने विकली जात होती. केळींच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे ग्राहकांचा खरेदीकडे कल कमी झाल्याचे दिसून येत आहे.

उद्यानांमध्ये गर्दी

सातारा : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे येथील आयुर्वेदिक गार्डनमध्ये अबालवृद्धांची गर्दी वाढू लागली आहे. सकाळी तसेच सायंकाळी बागांमध्ये बालचमूंची गर्दी ओसंडून वाहत आहे. पालिकेच्या वतीने या उद्यानांचे नूतनीकरण करण्यात आल्याने अबालवृद्धांमधून समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाची धास्ती असल्याने उद्यानात येणा-यांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

घाणीचे साम्राज्य

सातारा : येथील महात्मा फुले तसेच पोवई नाका भाजीमंडईत कचरा कुंडी नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरत आहे. घाणीमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने मंडई परिसरात कचरा संकलनाची व्यवस्था करावी, अशी मागणी व्यापारी व व्यावसायिकांमधून होत आहे.

Web Title: Youth riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.