आपली भेट, पुढच्या निवडणुकीत थेट!
By Admin | Updated: October 13, 2014 23:06 IST2014-10-13T22:27:07+5:302014-10-13T23:06:10+5:30
ऐका दाजिबा..

आपली भेट, पुढच्या निवडणुकीत थेट!
‘हुश्श! सुटलो बुवा एकदाचं. महिनाभर प्रचार करून-करून पिट्टा पडला. एवढी इलिक्शानं झाली पन् यंदाचं इलिक्शान करवंदाच्या जाळीसारखं गुतागुतीचं आन् नेत्यांच्या इभ्रतीचं झालं! म्हंजी म्होरं सोन्याची अंडी देणारी कोंबडी दिसावी आन् तिला पकडायला आख्ख्या गावानं तिच्यामागणं गल्लीबोळातनं पळावं, आसं सगळीकडं दिसत हुतं!’ पारावर रंगलेल्या बैठकीत सुस्कारा सोडत शिरपा व्यक्त झाला.‘तर हो, लोकांनी वाहत्या गंगेत ‘हात’ धुतलाय तर उमीदवारांचं आख्खं ‘घोडं’ गंगेत न्हाणार हाय! इरोधकांचा भाषणात खरपूस समाचार घेण्यापास्नं ते टोला लगावण्यापर्यंत यंदा मजल गेली. उणीदुणी निघाली, एकमेकांना उघडं पाडलं, खाजगी गोष्टी चव्हाट्यावर मांडल्या गेल्या, पैशाचा तर महापूर आला! ‘चौदाव्या रत्ना’साठी ह्यो सारा खेळ मांडलाया बगा!’ आता जनता ‘चौदावं रत्न’ म्हणून कुणाला जन्माला घालणार आन् कुणाला ‘चौदावं रत्न’ दावणार, हे १९ तारखेला समजलंच.’ नारूनं सगळा वृत्तांत सांगितला. दाजिबा दिसंना कुठं ? आता तर प्रचारबी संपलाय. कुठं गायब झाला म्हणायचा?’ पारावर बसलेल्या सगळ्यांनी आठवण निघाली.‘मंडळी, ह्या इलिक्शानात तसं बरंच काय गायब झालंय! सगळं चव्हाट्यावर आलं; पन् ते सगळं राजकारण्यांच्या सोयीचं, जनतेच्या सोयीचं गायब केलं! ‘महाराष्ट्र देशात सगळ्यात पुढं आसंल’ असं सांगणारे महाराष्ट्रातलं उद्योगधंदं आन् म्हत्वाची सरकारी हाफिसं गुजरातला पळवत असल्याचं जसं त्यांच्या जाहीरनाम्यातनं गायब झालं; तसंच मंडळी ‘दाजिबा’ आता गायब झालाय. परत्येक पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात जनतेला विकासाचं गाजर दावलंय खरं; पण निवडून आल्यावर जनतेला ‘टाटा’ करून जाणारं नेतं थेट पुढच्या निवडणुकीलाच दर्शन देणार, हे जसं ठरल्यालं हाय, तसंच पुढच्या निवडणुकीतच आता ‘दाजिबा’चं दर्शन आपल्याला व्हणार आहे.’ नारूचं खोचक आणि सूचक बोल ऐकून अख्खा पार शून्यात गेला.
प्रदीप यादव