खेळ होतोय तुमचा.. जीव जातोय आमचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST2021-03-08T04:36:57+5:302021-03-08T04:36:57+5:30
पेट्री : जिल्ह्यासह सातारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणवा लावण्याच्या घटनांत वाढ झाली असतानात रविवारी जैवविविधतेने नटलेला कास तलाव ...

खेळ होतोय तुमचा.. जीव जातोय आमचा
पेट्री : जिल्ह्यासह सातारा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वणवा लावण्याच्या घटनांत वाढ झाली असतानात रविवारी जैवविविधतेने नटलेला कास तलाव परिसर व गणेशखिंड पठारही वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडला. या वणव्यात वृक्षसपंदेची हानी तर झालीच शिवाय हजारो पशू-पक्ष्यांची घरटीही जळून खाक झाली. विघ्नसंतोषींकडून अशा घटना सातत्याने वाढू लागल्याने ‘खेळ होतोय तुमचा.. जीव जातोय आमचा’ अशी आर्त हाक पशू-पक्ष्यांकडून दिली जात आहे.
सातारा शहराच्या पश्चिमेकडील परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यावर येथील पशूधन पोसलं जातं. एवढंच काय येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागातील जनावरांचीदेखील भूक भागते. अशा या परिसरात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विघ्नसंतोषींकडून वणवा लावण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होऊ लागली आहे.
कास तलावाचा परिसरात रविवारी दुपारी लागलेल्या वणव्यात वनसंपदेसह प्राणीसंपदेचीही मोठी हानी झाली. कास पठार कार्यकारिणी समितीचे कर्मचारी गणेश आटाळे, अंकुश अहिरे, भगवान आखाडे, गणेश चिकणे, महेश कदम यांनी झाडाच्या फांद्या आणि फायरगनद्वारे दोन तास अथक प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. यापाठोपाठ विघ्नसंतोषींकडून गणेशखिंड पठारावरही वणवा लावण्यात आला. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले व बघता-बघता संपूर्ण पठार आगीत खाक झाले. या आगीत पशू-पक्ष्यांची घरटी जळून खाक झाली, तर मोठ्या प्रमाणात गवतही जळाले. आगीच्या ज्वाळा इतक्या मोठ्या होत्या की दूर अंतरावरूनही ही आग नजरेस पडत होती.
पश्चिम भागात शेतीबरोबर पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. गुरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकरी प्रयत्न करतात. मात्र, सध्या या परिसरात ठिकठिकाणी वणवे लावण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे पश्चिम, तसेच दुष्काळी भागातील जनावरांना पोसणारा हा चारा नष्ट होत असल्याने पशूपालकांपुढे जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
(चौकट)
मुक्या पशुपक्ष्यांचा आक्रोश..
वणव्यात पशूपक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला. अनेक घरटी त्यातीत अंडी व पिलेही जळून खाक झाली. ज्या ठिकाणी वणवा लागला त्या ठिकाणी अनेक पशू-पक्षी आभाळात घिरट्या घालताना दिसून आले. पशू-पक्ष्यांचा हा चिवचिवाट मन हेलावून टाकणारा होता.
(चौकट)
बेजबाबदार वृत्तीला
लगाम घालणार कोण?
वाहने चालविताना पेटती सिगारेट, काडी पेटीची काडी वाटेल तेथे टाकली जाते. त्यामुळे वणवे लागत आहेत. यामध्ये कित्येक वन्यजिवांचा हकनाक बळी जात असून, पशुपक्ष्यांच्या निवाऱ्यांनादेखील धोका निर्माण होत आहे. तसेच या वणव्यामुळे येथील वनसंपदा धोक्यात येऊ लागली आहे. काही अतिउत्साही पर्यटकांकडून वणवा लावला गेल्याने यवतेश्वर-कास मार्गावर हजारो टन चारा जळून खाक झाला आहे. अशा बेजबाबदार वृत्तीला व हुल्लडबाजीला आवर घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
(चौकट)
वणव्यामुळे हे झाले...
- हजारो टन चारा नष्ट
- पशू-पक्ष्यांचे निवारे नष्ट
- वृक्ष व प्राणीसंपदेचे अस्तित्व धोक्यात
- वन्यजिवांच्या अधिवासात बदल
- धुरामुळे वायू प्रदूषण.
- गवताची कुरणं, हिरवी झाडे होरपळली
- फळे, रानमेवा नष्ट
- परागीभवन करणारे कीटक व इतर जीव आगीच्या भक्ष्यास्थानी
फोटो : ०७ सागर चव्हाण ०१/०२
कास तलाव परिसर व गणेशखिंड पठारावर रविवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वणवा लागला. या वणव्यात गवताच्या कुरणांनी बहरून गेलेले गणेशखिंड पठार आगीनंतर असे काळेकुट्ट झाले. (छाया : सागर चव्हाण)