तरुणांनी शिवरायांचे विचार जपावेत : उदयनराज
By Admin | Updated: February 15, 2015 23:41 IST2015-02-15T20:46:51+5:302015-02-15T23:41:01+5:30
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय : शिवकालीन दुर्मीळ पत्रे, भांडी, नाणी, शस्त्रांचे प्रदर्शने

तरुणांनी शिवरायांचे विचार जपावेत : उदयनराज
सातारा : ‘देशातील माणसांचा आचार-विचार, संस्कृती बदलून माणुसकी नष्ट होत आहे. देश गुलामगिरीकडे वळत आहे. देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. प्रत्येक भारतीयांनी शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा, स्फूर्ती घेऊन प्रत्येकांनी छत्रपतींच्या विचारांचा वारसा आचरणात आणणे काळाची गरज आहे,’ असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात आयोजित केलेल्या ऐतिहासिक व शिवकालीन दुर्मीळ पत्रे, भांडी व नाणी, ग्रंथ, शिवकालीन शस्त्रास्त्रे यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष नासिर शेख, नगरसेवक प्रकाश बडेकर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, प्रतिभा चिकमठ, प्रा. दीपक जाधव, उपप्राचार्य डॉ. आर. जी. पाटील, प्रा. दशरथ साळुंखे उपस्थित होते. उदयनराजे भोलसे म्हणाले, ‘परदेशी कंपन्या व पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण देशात केले जात आहे. गॅट करार व जागतिकीकरणामुळे देशातील विविध राजकीय पक्ष, देशप्रेम, भक्तिभाव संपुष्टात येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, हे सर्व टाळण्यासाठी देशाला छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे.’प्राचार्य शेजवळ म्हणाले, ‘सातारा या शाहूनगरीला छ. शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आहे. सातारा ही छत्रपतींची राजधानी आहे. छत्रपतींनी सर्वांना माणुसकी व धर्माचे पालन करण्याची शिकवण दिली. महाविद्यालयाने शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा इतिहास महोत्सवातून जपला आहे.’प्रा. मयुरा राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले. संयोजक प्रा. दीपक जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)