वाढदिवसाचा केक दुसऱ्यासोबत कापल्याने युवकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:17+5:302021-03-25T04:37:17+5:30
साताराः एका युवकाला तू दुसऱ्यासमवेत केक का कापलास म्हणून लोखंडी फायटरने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात ...

वाढदिवसाचा केक दुसऱ्यासोबत कापल्याने युवकास मारहाण
साताराः एका युवकाला तू दुसऱ्यासमवेत केक का कापलास म्हणून लोखंडी फायटरने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आदित्य बनसाडे, यश चव्हाण व अथर्व बर्गे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार, दि. २१ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोडोली परिसरात असणाऱ्या अण्णासाहेब कल्याणी शाळेसमोर आदित्य बनसाडे (रा. बॉम्बे रेस्टॉरंट, सातारा), यश चव्हाण (रा. अमरलक्ष्मी, सातारा) आणि अथर्व बर्गे (रा. माहुली, सातारा) या तिघांनी हर्षद नितीन साळुंखे (वय १७, रा. मंगलमूर्ती अपार्टमेंट, मोरे कॉलनी, गोडोली, सातारा. मूळ रा. सासुर्वे, ता. कोरेगाव) याला ‘तू नीलेश शिंदे याच्यासोबत केक का कापलास..?,’ अशी विचारणा करत मारहाण केली. यावेळी या तिघांनीही हर्षद याला हातातील लोखंडी फायटरने डोळ्याच्या खाली मारले आणि जखमी केले. तसेच हर्षद याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळही केली. याप्रकरणी हर्षद याने मंगळवार, दि. २३ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आदित्य बनसोडे, यश चव्हाण, अथर्व बर्गे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.