तरूण पिढीची खादीकडे पाठ! लोकमत सर्वेक्षण
By Admin | Updated: July 21, 2014 23:08 IST2014-07-21T23:05:09+5:302014-07-21T23:08:52+5:30
ज्येष्ठांमध्ये अजूनही ‘क्रेझ’ : देखभाल खूप आणि वैविधता कमी

तरूण पिढीची खादीकडे पाठ! लोकमत सर्वेक्षण
प्रगती जाधव-पाटील - सातारा
बाजारात कमी किमतीत उपलब्ध असलेले हजारो व्हरायटीचे शर्ट आणि पॅन्ट, महिना दोन महिन्याला बदलत जाणाऱ्या फॅशन आणि मेन्टेनन्सची चिंता या कारणामुळे तरूणाईने खादीच्या वापराकडे पाठ फिरविली आहे, तर मध्यमवयीन आणि ज्येष्ठांवर अजूनही खादीची मोहिनी कायम आहे.
सातारा शहरात गाझियाबाद, हरियाणा व पुणे आदी ठिकाणांहून खादीचे कापड येते. बघताक्षणी मोहात पडावं अशा रंगांमध्ये आता खादी उपलब्ध असली तरीही ती खरेदी करण्याकडे तरूणाईचा कल जरा कमी आहे. किंमत आणि मेन्टेनन्सला अधिक असल्यामुळे तरूणाई खादीला प्राधान्य देत नाही. त्याउलट मध्यवयीन व ज्येष्ठांवर मात्र खादीची मोहिनी अजून कायम आहे.
पुरूषांच्या बरोबरीनेच महिलांनाही खादीच्या साड्यांची भुरळ पडत आहे. विशिष्ट रंगसंगतीत ‘डिसेंट डिझाईन’ असलेली साडी महिलांना मोहात पाडते. मोजक्याच आणि देखण्या साड्या खादीत येत असल्यामुळे या खरेदी करण्याकडे महिलांचा कल अधिक आहे. या साड्यांचे दरही बाराशे ते अडीच हजार रूपयांपर्यंत असतात.
तेच ते ड्रेस मटेरियल घालून कंटाळलेल्या तरूणींना मटका खादीचे विशेष आकर्षण आहे. थोडी भडक रंगसंगती आणि आकर्षक डिझाईनमुळे हे ड्रेस मटेरियल तरूणींना भावते. खास कार्यक्रमासाठी तरूणी खादीच्या ड्रेसला पसंती देतात. हे ड्रेसही आता पाचशे रूपयांपासून दोन हजारापर्यंत उपलब्ध आहेत.
रोज बदलत जाणाऱ्या फॅशनच्या दुनियेत म्हणूनच खादी वेळ खाऊ वाटते; पण काहीजण आजही याचे डायहार्ट फॅन आहेत.
पेपर सिल्कला पुरूषांची सर्वाधिक पसंती
पुरूषांमध्ये पेपर सिल्क खादीला विशेष पसंती दिली जाते. हे कापड प्रामुख्याने शर्टसाठी वापरण्यात येते. अंगाबाहेर राहणारे, कडक लुक देणारे, इस्त्री न मोडणारे आणि फिकट रंग ही या कापडाची खासीयत आहे. सुती खादीच्या तुलनेत या कपड्यांची निगा कमी राखावी लागते. तेच ते कॉटन, टेरिलीन, टेरिकॉट कापड घालून कंटाळलेल्यांसाठी खादी हा सर्वाेत्तम पर्याय आहे. फॅन्सी बटण आणि कफ्लिंग्स लावून खादीचे शर्टही ‘फेस्टिव्ह’ होऊ लागले आहेत.
मटका खादी महिलांचे आकर्षण
साडी हा महिलांचा वीक पॉर्इंट मानला जातो. कितीही साड्या असल्या तरी ‘तिची’ साडी सुरेखच होती, हे म्हणण्याची महिलांची सवय आहे. मटका खादीमध्ये असणाऱ्या साड्याही अशाच वनपीस असतात. एक से एक डिझाईन आणि हलक्या रंगांमध्ये येणाऱ्या या साड्या महिलांना आकर्षित करतात. अन्य फॅन्सी साड्यांच्या तुलनेत या साड्या स्वस्त आणि डिझायनर वाटतात. त्यामुळे विशेष कार्यक्रम, घरगुती गेट-टुगेदर अशांसाठी या साड्यांना प्राधान्य दिले जाते.
खादीचे कपडे अन्य कपड्यांच्या तुलनेने महाग असतात. त्यांची निगा ठेवावी लागते. महाविद्यालयीन युवक-युवतींना फॅशनेबल आणि रंगीत कपडे घालायला आवडतात. हे कपडे त्यांना बाजारात कमी किमतीत मिळतात. त्यामुळे तरूणाई खादीचे कपडे घ्यायला प्राधान्य देत नाही.
- विक्रम भोरे,
खादी व्यावसायिक
खादीचे प्रकारकापडाचा रंग कापडाचा वापर
सिल्क खादीपांढरा व फिकट रंग पुरूषांसाठी शर्ट-महिलांसाठी कुर्ता
पॉली खादीरंगीत व पांढरेहीपुरूषांसाठी शर्ट-महिलांसाठी ड्रेस मटेरियलसुती खादीपांढरा रंगपुरूषांसाठीच शर्ट- इस्त्री, स्टार्च आवश्यकच
फॉर्मल आणि फंक्शनल या दोन्ही प्रकारच्या शर्टला उत्तम पर्याय म्हणजे खादी. डिसेंट आणि तितकाच भारदस्त लुक या शर्टमुळे येतो. नेटकेपणा आणि टापटीप आवडणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी खादीचा शर्ट वापरून पाहावा. यातील वावरणं खूप सुखावह असते.
- अभिनंदन मोरे, नोकरदार