योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST2021-09-16T04:48:23+5:302021-09-16T04:48:23+5:30

दहिवडी : खेलो इंडिया निवड प्रक्रियेसाठी योगासन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यातून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ...

Yogasana sports competition program announced | योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

दहिवडी : खेलो इंडिया निवड प्रक्रियेसाठी योगासन स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, त्यातून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघांची निवड केली जाणार आहे. मुला-मुलींच्या स्वतंत्र तीन वयोगटांत होणाऱ्या या स्पर्धेतून प्रत्येक गटातील चौदा खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संघात निवड केली जाणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून योगासनांच्या विविध पाच स्पर्धा प्रकारांचे व्हिडिओ मागविण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या योगासन खेळाडूंनी आपल्या जिल्ह्यातील स्पर्धा समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी यांनी केले आहे.

भारत सरकारने योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यानंतर राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनच्यावतीने देशभरातील योगासन खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनने राज्यातील योगासन स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या स्पर्धत ९ ते १४ ते १८ व १८ वर्षांपुढील मुला-मुलींचे स्वतंत्र तीन गट असतील. प्रत्येक गटात सहभागी स्पर्धकाचे वय ३१ डिसेबर २०२१ पर्यंतचे गृहित धरले जाणार आहे.

पारंपरिक योगासन (वैयक्तिक), कलात्मक योगासन (वैयक्तिक व दुहेरी), तालात्मक योगासन (दुहेरी) व सांघिक कलात्मक (पाच खेळाडू) अशा पाच प्रकारांमध्ये होणार्या या स्पर्धेतून प्रत्येक गटातील प्रत्येकी चौदा खेळाडूंची जिल्हास्तरावरून राज्य पातळीवर व राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येणार आहे. १८ सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेसाठी नावे नोंदणी करता येणार असून, अधिकाधिक योगासन खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Yogasana sports competition program announced