सकाळी योगा, दुपारी झोपा ! सरकारी कर्मचारी थकले :

By Admin | Updated: June 22, 2016 00:06 IST2016-06-21T22:27:22+5:302016-06-22T00:06:32+5:30

योगामुळे दिवसभरच्या कामावर परिणाम; शासकीय कार्यालयातील स्थिती, बातमीनंतरची बातमी

Yoga in the morning, sleep in the afternoon! Government employees tired: | सकाळी योगा, दुपारी झोपा ! सरकारी कर्मचारी थकले :

सकाळी योगा, दुपारी झोपा ! सरकारी कर्मचारी थकले :

कऱ्हाड : बारा महिने आरामदायी खुर्चीवर बसून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अचानक योगासने करायला लावल्यास त्यांची अवस्था काय होईल. किंवा सवय नसतानाही योगासने करण्याची वेळ आल्याने त्याचा कशाप्रकारे कामावर परिणाम होतो. याची प्रचीती मंगळवारी येथील पंचायत समिती, पालिका कार्यालयातील शासकीय विभागातील अधिकाऱ्यांकडे पाहिल्यास आली. सवय नसतानाही योगासने केल्यामुळे काही अधिकारी दिवसभर कार्यालयात डुलक्या तर काहीजण थकलेल्या अवस्थेत दिसून आले.
आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिवस मंगळवारी सकाळी येथील शासकीय कार्यालये, पंचायत समिती, पालिका तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. योगासने केल्याने शरीरास उत्तम आरोग्य लाभते. अनेक रोगांपासून सुटका मिळते. म्हणून सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी या दिवशी योगासने करणे बंधनकारक असल्याचे सांगत संबंधित विभागांना तसे शासनाच्या वतीने आदेशही देण्यात त्याबाबतच्या नोटिसाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्या विभागांना पाठविण्यात आलेल्या होत्या. या योगदिनानिमित्ताने योगासनाचे महत्त्व वाढण्यास मदत होईल हा उद्देश ठेवून योगदिन मंगळवारी सर्व शासकीय कार्यालयात साजरा करण्यात आला.
योगासनांमध्ये करण्यात येणाऱ्या आसनांना मोठे महत्त्व असते. कारण त्यांच्यानुसार शरीराचा व्यायाम करणे गरजेचे असते. नाहीतर शारीरिक व्याधीही होण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या योगासनांच्या प्रकाराची पुरेशी माहिती काहींना नसल्याने त्यांना योगासन केल्यामुळे त्रासही जाणवू लागला. ओबड धोबड शरीरामुळे काहींची व्यायाम करताना चांगलीच फजिती उडाली. तर काहींजण दिवसभर सुस्त अवस्थेत दिसून आले.
येथील पंचायत समिती कार्यालयात तर अनेक अधिकाऱ्यांचे चेहरे सुकलेले तर काहीजण थकलेल्या अवस्थेत दिसून आले. बारा महिने खुर्चीवर बसून संगणकावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची अवस्था ही सकाळी योगासने करून दिवसभर काम केल्यामुळे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही.
नियमित कामाची सवय असल्यामुळे अशा प्रकारचा योगदिन नियमित घेण्यात यावा, असे काहींनी सांगितले तर काहीजणांनी असा योगदिन नको रे बाबा ! असे सांगितले. तसे पाहिले तर शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आरोग्याच्या दृष्टीने फीटच असणे गरजेचे आहे. त्यामुळे याचा ताण कामावर येत नाही. जर आजारी असल्यामुळे कामावर जास्त प्रमाणात ताण येतो. म्हणून नियमित योगासने करणे गरजेचे आहे; पण अचानक योगासने केल्यामुळे काय फजिती होते, याचा प्रत्यय मंगळवारी अधिकाऱ्यांना आला. (प्रतिनिधी)

कार्यालये दिवसभर सामसूम !
सकाळी योगासने करून दिवसभर कामावर हजर राहण्याची सक्ती केल्यामुळे अनेकांनी कामाचे निमित्त काढून कार्यालयातून बाहेर पडले. त्यामुळे पंचायत समिती, पालिका तसेच इतर शासकीय कार्यालयात दिवसभर अधिकारीच नसल्याने नागरिकांना परत जावे लागले. मात्र, अधिकारीच गेले कुठे, आज सर्वत्र शांतता कशी काय पसरलेली आहे. याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात होती. तर अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने कार्यालये ओस पडलेली दिसून आली.

Web Title: Yoga in the morning, sleep in the afternoon! Government employees tired:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.