येवती ग्रामस्थांनी साकारला लोकवर्गणीतून शेतरस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:31+5:302021-06-04T04:29:31+5:30
उंडाळे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे नव्वद टक्के जनता घरात आहे तर ...

येवती ग्रामस्थांनी साकारला लोकवर्गणीतून शेतरस्ता
उंडाळे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे नव्वद टक्के जनता घरात आहे तर काही लोक विनाकारण शहरातून फिरत आहेत. पण येवतीतील ग्रामस्थांनी या लॉकडाऊनचा सदुपयोग करत लोकवर्गणीतून शेतरस्ता साकारला. यामुळे कित्येक पिढ्यांची समस्या चुटकीसरशी दूर झाली आहे.
कऱ्हाड तालुक्यातील येवती येथील शेतरस्ता हा बाराभैरी देवस्थानकडे जातो. गेल्या साधारण दीडशे वर्षांपासून हा कच्चाच रस्ता होता. या रस्त्यावरून केवळ चालत जावे लागत होते. हाच विचार करून येथील रस्ता करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले व तब्बल दहा ते पंधरा दिवसांत हा रस्ता पूर्ण केला. ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेऊन घरोघरी लोकवर्गणी गोळा करून हा रस्ता करण्याचे ठरवले. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावरून पायी चालणेदेखील कठीण झाले होते. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते. याचाच विचार ग्रामस्थांनी केला व साधारण दोन किलोमीटरचा रस्ता सुमारे दहा दिवसांत पूर्ण केला. या कामासाठी जेसीबीची व्यवस्था राहुल भोसले व अमित बुधकर या दोघांनी मिळून केली. त्यांनीसुद्धा या सामाजिक कार्यात गावाला हातभार लावला. हा रस्ता झाल्याने कमीत कमी आता दुचाकी व ट्रॅक्टर ही वाहने या रस्त्यावरून जाऊ शकतात. या रस्त्याला शासनाने निधी उपलब्ध करून दिल्यास हा रस्ता बाराभैरी देवस्थानकडे जाण्यासाठी भक्तांना सोयीचा होईल. त्यासाठी या रस्त्याला शासकीय निधी मिळावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
चौकट :
विनामजूर मेहनत
गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने योग्य नव्हता. याचाच विचार करून लोकवर्गणीतून हा रस्ता करण्याचे ठरविले. ग्रामस्थांनीही सहकार्य केले. आम्ही ग्रामस्थांनी या कामासाठी कुठल्याही प्रकारे मजूर न लावता स्वतः मेहनत घेत रस्ता पूर्ण केला. आता या रस्त्याला शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येवतीतील ग्रामस्थ राजेंद्र शेवाळे यांनी केली आहे.
फोटो ०३ उंडाळे
कऱ्हाड तालुक्यातील येवती येथील ग्रामस्थांनी लॉकडाऊन काळात लोकवर्गणीतून शेतरस्ता साकारला. (छाया : ज्ञानेश्वर शेवाळे)