‘यशवंत पंचायत राज’मध्ये कऱ्हाड समिती राज्यात दुसरी
By Admin | Updated: March 16, 2016 08:29 IST2016-03-16T08:24:42+5:302016-03-16T08:29:22+5:30
देवराज पाटील : मुंबई येथे २० रोजी होणार पुरस्कार वितरण

‘यशवंत पंचायत राज’मध्ये कऱ्हाड समिती राज्यात दुसरी
कऱ्हाड : ‘ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे असते. विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. यासाठी ‘यशवंत राज अभियान’ ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. त्यामध्ये राज्यस्तरावर दुसरा व विभाग स्तरावर पहिला क्रमांक कऱ्हाड पंचायत समितीचा आला असून, याचे वितरण दि. २० रोजी मुंबई येथे ‘यशवंत पंचायत राज अभियान’ कार्यक्रमात करण्यात येणार आहे,’ अशी माहिती सभापती देवराज पाटील यांनी दिली.
कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. सभापती पाटील म्हणाले, ‘पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांनी सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामांचे मूल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर अशा दोन स्तरांवर यशवंत पंचायत राज अभियान ही योजना यावर्षी देखील राबविण्यात येत आहे.
यासाठी राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर प्रत्येकी तीन पंचायत समित्यांची निवड करण्यात येणार होती. या समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून नुकतीच कामकाजाबाबतची माहिती प्रत्यक्ष भेटीतून करण्यात आली होती. त्यातून कऱ्हाड पंचायत समितीची निवड करण्यात आली. त्यामध्ये राज्य स्तरावर पंचायत समितीगणात कऱ्हाड पंचायत समितीला दुसरा क्रमांक तर विभागस्तरावर पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)