येरे येरे पावसा... मालात गुंतलाय पैसा!

By Admin | Updated: June 23, 2016 01:43 IST2016-06-22T23:38:47+5:302016-06-23T01:43:07+5:30

जिवाला घोर : उधारीवरील हंगामी व्यवसाय अडचणीत

Yere Yere rosa ... money invested in the field! | येरे येरे पावसा... मालात गुंतलाय पैसा!

येरे येरे पावसा... मालात गुंतलाय पैसा!

सातारा : हंगामी व्यावसायिक हे ऋतूंवरील बदलानुसार आपला व्यवसाय करीत असतात. सध्या मान्सून सुरू आहे. यामुळे हंगामी व्यावसायिकांनी उधारी, कर्जावर पावसाळी माल उचलला आहे. परंतु अद्यापही पाऊस न पडल्याने हंगामी व्यावसायिकांच्या मालाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. गुंतविलेला पैसा वेळेत परत न केल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे येरे येरे पावसा मालात गुंतलाय पैसा अशी म्हणायची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे.मे महिन्यापासूनच हवामान खात्यामार्फत यंदा पाऊस चांगला राहणार व वेळेच्या आधी सुरू होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पैशांची जुळवाजुळव करत पावसाठी छत्री, रेनकोट, जर्किन, प्लास्टिक कागद, ताडपत्री, बुटचप्पल अशा विविध वस्तुंमध्ये पैसे गुंतवले आहेत. परंतु अद्यापही पावसाची सुरुवात झाली नसल्याने या व्यावसायिकांचा माल पडून आहे. यामधील काही व्यावसायिकांनी व्याजावरही पैसे उचलून मालात गुंतवणूक केली आहे. साधारणत: हंगामी व्यावसायिक एक किंवा दोन महिन्यांच्या के्रडिटवरच माल उचलतात. परंतु मान्सून सुरू होऊन देखील पाऊस पडत नसल्याने या व्यावसायिकांना पैसे परत करण्याची धास्ती लागून राहिली आहे.पावसाळा सुरू होताच छत्री, रेनकोट, जर्किन हा व्यवसाय तेजीत राहतो. यातून उत्पन्नही चांगले मिळते. त्यामुळे व्यावसायिक यामध्ये लाखो रुपये गुंतवितात. मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडला नाही. यंदा मात्र प्रमाणापेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने व्यावसायिकांनीही गुंतवणूक केली आहे. परंतु पावसाअभावी हा माल आजही पडून राहिला असल्याने व्यावसायिकांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. (प्रतिनिधी)


आम्ही मोठ्या व्यापाऱ्यांकडून उधारीवर माल खरेदी करतो. पाऊस झाला नाही तर पावसाळ्यासाठी लागणाऱ्या छत्र्या, रेनकोट खपणार नाहीत. हा माल आमच्याकडून पडून राहिल्यास याचे पैसे परत कसे करणार ही चिंता पडली आहे.
-सलमान बागवान, हंगामी व्यावसायिक

Web Title: Yere Yere rosa ... money invested in the field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.