पिवळ्या हळदीला सोन्याची झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:14+5:302021-03-09T04:42:14+5:30
कुडाळ : जावळी तालुक्यात नगदी उत्पादन देणाऱ्या उसाच्या पिकाखालोखाल हळदीचेही पीक घेतले जाते. यंदा हळदीचे उत्पादन चांगले झाले ...

पिवळ्या हळदीला सोन्याची झळाळी
कुडाळ : जावळी तालुक्यात नगदी उत्पादन देणाऱ्या उसाच्या पिकाखालोखाल हळदीचेही पीक घेतले जाते. यंदा हळदीचे उत्पादन चांगले झाले असून त्याला सोन्याची झळाळी मिळाली आहे. बाजारपेठेत उच्चांकी दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत आहे.
तालुक्यातील कुडाळ, सर्जापूर, सरताळे, सायगाव, आनेवाडी आदी ठिकाणी हळदीचे पीक घेतले जाते. चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना या पिकाकडे वळण्याचा कल पाहायला मिळतो. काही शेतकरी पूर्वजांपासून दरवर्षीच हे पीक घेत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांचा विचार करता हळदीला फारसा दर मिळाला नाही. साधारणपणे चार ते पाच हजारांनाच विक्री झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
यावर्षी मात्र हळदीला सोन्याची झळाळी मिळाली आहे. गेल्या पाच वर्षांतील दराच्या दुप्पट दराने हळद खरेदीचे लिलाव होत आहेत. क्विंटलला सुमारे १२ हजारांपर्यत भाव मिळत असल्याने शेतकरीही काहीसा आनंदित झाला आहे. आठ महिन्यांच्या या पिकासाठी एकरी सरासरी ४० ते ५० हजारांचा खर्च येत असतो. यावर्षी कोरोनामुळे मजुरांअभावी हळद काढणीसाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
कोट :
गत चार वर्षांत हळदीला फारच कमी दर मिळत होता. चालूवर्षी पावसामुळे हळद लागली असली तरी उत्पादन चांगले मिळाले आहे. उत्पादन खर्च वाढला असून दरही बऱ्यापैकी मिळत आहे. सध्या ९ ते १२ हजारांपर्यत दर मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. हळदीला १५ हजारांपेक्षा अधिकचा भाव मिळावा अशी आमची अपेक्षा सर्जापूर येथील शेतकरी विनोद रामदास मोहिते यांनी व्यक्त केली.