‘कमळाच्या झटक्यात’ येळगावकर लटकले !

By Admin | Updated: August 5, 2014 23:41 IST2014-08-05T21:21:48+5:302014-08-05T23:41:24+5:30

एकाच वेळी ‘मोठा बॉम्ब’ : थोडे थांबण्याचा दिला गेला सल्ला

Yelgaonkar hangs in 'Kamal's shock' | ‘कमळाच्या झटक्यात’ येळगावकर लटकले !

‘कमळाच्या झटक्यात’ येळगावकर लटकले !

सातारा : राष्ट्रवादी सोडून भाजपवासी होण्यासाठी निघालेले माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांना अजूनही राज्य पातळीवरील नेत्यांच्या ‘हॉटलाइन’ची प्रतीक्षा लागून राहिली आहे. राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांशी येळगावकर यांनी स्वत:हून संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी त्यांना ‘अजून थोडे थांबा. आपण पश्चिम महाराष्ट्रात एकदाच मोठा झटका देऊ,’ असे सांगून थांबविले आहे. परिणामी येळगावकर आता भाजपच्या नेत्यांच्या निरोपाचीच प्रतीक्षा करत बसले आहेत.
तीन दिवसांपूर्वी भाजपच्या राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी सातारा येथे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, जाता-जाता भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी त्यांनी काँग्रेसबरोबरच डॉ. दिलीप येळगावकरांचीही गोची करून टाकली आहे. काँग्रेसला तर खास माजी आमदार मदन भोसले यांच्यासाठी पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट कारवी लागली. येळगावकर मात्र राज्यपातळीवरील नेत्यांवर हवाला ठेवून जिल्ह्यात फिरत आहेत.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. दिलीप येळगावकर यांच्यावर राष्ट्रवादीकडून कमी-अधिक प्रमाणात टीका झाली. मात्र, त्यांनी या टीकेला उत्तर काही दिले नाही. याचवेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आ. गिरीश बापट, आ. पंकजा मुंडे-पालवे, विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली आहे. यापैकी काहीची त्यांनी प्रत्यक्षात भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, यापैकी प्रत्येक नेत्यांनी त्यांना ‘वेट अँड वॉच’ असाच सल्ला दिला आहे. येळगावकर यांनी माणमधून विधानसभा लढणार असल्याचेही पक्षाच्या नेत्यांसमोर स्पष्ट केले आहे.
भाजपने यावेळी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याचा निर्धार केला आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांत काँग्रेस, राष्ट्रवादीतील नाराज चेहऱ्यांच्या हाती ‘कमळ’ कसे देता येईल, यासाठी रणनीती आखली आहे. येळगावकर यांनी ज्यावेळी राज्य पातळीवरील भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधला, त्यावेळी त्यांना याची कल्पना देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकाचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भाजप झटका देण्याच्या तयारीत आहे. पुन्हा भाजपवासी होण्यासाठी निघालेल्या येळगावकर यांना थांबावे लागले आहे. (प्रतिनिधी)

भाजपच्या वाट्याला किती मतदारसंघ..?
सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी भाजपच्या वाट्याला माण, सातारा आणि कऱ्हाड दक्षिण हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. पाटण, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, फलटण हे मतदारसंघ शिवसेना लढली होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्रितपणे लढणार आहे, याविषयी कोणतीही शंका नाही. भाजपच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची मागणी झाली आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही काही विधानसभा मतदार संघाची मागणी पुढे रेटली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा विचार करता महायुतीत जागावाटपाचे त्रांगडे निर्माण होणार आहे. परिणामी सातारा जिल्ह्यात असणाऱ्या एकूण आठ विधानसभा मतदारसंघापैकी भाजपच्या वाट्याला किती मतदारसंघ येणार याचीच आता साऱ्यांना प्रतीक्षा आहे.

माझे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी वारंवार बोलणे होत आहे. माझी भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आहे. त्यांनीही हिरवा कंदील दिला आहे. आता फक्त वेळेची वाट पाहतोय. लवकरच त्याचाही निर्णय होईल. तोपर्यंत थांबणे भाग आहे.
- डॉ. दिलीप येळगावकर,
माजी आमदार, खटाव

Web Title: Yelgaonkar hangs in 'Kamal's shock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.