पंचायत समितीला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा

By Admin | Updated: March 2, 2016 23:57 IST2016-03-02T22:20:24+5:302016-03-02T23:57:11+5:30

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण; पंचायत समिती संकेतस्थळाचे लोकार्पण

Yashwantrao's thoughts on Panchayat Samiti | पंचायत समितीला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा

पंचायत समितीला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा

कऱ्हाड : ‘कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाते. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास करण्याचा प्रयत्न केला जातो,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.कऱ्हाड पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण व संकेतस्थळाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, सभापती देवराज पाटील, मलकापूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, डॉ. राजकुमार पवार, जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे, नीलम पाटील, पंचायत समिती सदस्य सुरेश माने, प्रकाश वास्के, राजेंद्र बामणे सदस्या जबिता बगाडे, अश्विनी लवटे, अनिता निकम, पुष्पावती पाटील, रूपाली यादव, ज्योती गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यात नावलौकिक असलेल्या येथील पंचायत समितीने सर्व प्रकारची माहिती लोकांसाठी खुली व्हावी, या हेतूने कऱ्हाड पंचायत समितीचे स्वतंत्र संकेतस्थळाचे लोकार्पण व यशवंतराव चव्हाण नवीन सभागृहाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार चव्हाण म्हणाले, ‘राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. केंद्राबद्दल सांगायचे झाल्यास कच्च्या तेलांच्या किमती कमी झाल्याने सरकारला एकप्रकारची लॉटरी लागली आहे. त्यातून राज्यातील ग्रामीण भागात सुधारणा करणे अपेक्षित आहे,’ असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.यावेळी सभापती देवराज पाटील, आमदार आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी स्वागत केले. सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पाणी बचतीबरोबर आरोग्य सुधारणेचे आव्हान
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राज्यातील ग्रामपंचायतीच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १४ व्या वित्तआयोगाने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यातून ग्रामपंचायतींचा विकास करण्यात येणार आहे. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी बचतीबरोबरच शिक्षण व आरोग्याच्या सुधारणेचे मोठे आव्हान राज्यासमोर आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Web Title: Yashwantrao's thoughts on Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.