नवीन पुस्तक खरेदीपेक्षा झेरॉक्स बरी!
By Admin | Updated: January 7, 2015 23:31 IST2015-01-07T23:04:08+5:302015-01-07T23:31:08+5:30
स्वस्ताईत ग्राहक आकर्षित : पुस्तकांचा खप घटला

नवीन पुस्तक खरेदीपेक्षा झेरॉक्स बरी!
परळी : सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विविध पुस्तकांच्या झेरॉक्स काढून त्यांची विक्री होत असल्यामुळे पुस्तकांच्या खपात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे प्रकाशकांमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे मात्र काही झेरॉक्स सेंटर चालकांची चांदी होत आहे. बहुतांशी प्रकाशने कोल्हापूर, पुणे येथील असल्यामुळे कारवाईची शक्यता धुसर आहे.इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. इंजिनिअरिंगच्या पुस्तकांची किंमतही चारशे ते सहाशे रुपयांच्या घरात आहे. सर्वत्र विद्यार्थ्यांना महागडी पुस्तके खरेदी करणे शक्य होत नाही.
काहींना शक्य असले तरी ही पुस्तके स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे त्यांची बेकायदेशीर झेरॉक्स प्रत खरेदी करण्याकडे विद्यार्थ्यांचा कला वाढला आहे. काही विद्यार्थी, पालकांकडून पुस्तकांच्या किमतीनुसार पैसे वसूल करतात. प्रत्यक्षात मात्र झेरॉक्ससंच वापरून त्यातून शिल्लक राहिलेल्या पैशाची चैनीसाठी वापरत असल्याचेही उघड झाले आहे. मात्र, ज्या-ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी झेरॉक्सचा व्यवसाय जोमात आहे. (वार्ताहर)
स्पायरला पुस्तकांना मागणी
विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट सादर करावे लागत असल्यामुळे झेरॉक्स सेंटरमध्ये संगणकप्रणालीही अपडेट करण्यात आली आहे. या प्रणालीचा वापर करून बहुतांशी पुस्तकांच्या पीडीएफ फाईल्स तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आवश्यक त्या पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती काढून त्या स्पायरल बायडिंग करून पुरवल्या जातात. त्यामुळे नवीन पुस्तके खरेदी करण्यापेक्षा स्पायरल पुस्तके विद्यार्थी अधिक वापरत आहेत. यातूनच झेरॉक्स सेंटरवाल्यांची कमाई जास्त होत आहे.