अविनाश मोहितेंकडूनही विचारलेत लेखी प्रश्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:57+5:302021-03-25T04:37:57+5:30
कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २६ मार्चला होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ...

अविनाश मोहितेंकडूनही विचारलेत लेखी प्रश्न!
कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २६ मार्चला होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे विरोधी संस्थापक पॅनलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडे आपले प्रश्न लेखी स्वरूपात दिले आहेत. सभासदांना या प्रश्नांची उत्तरे मिळावीत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
अविनाश मोहिते यांनी पत्राद्वारे १४ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस असताना दरवर्षी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस का आणला जातो? कारखान्याच्या डिस्टलरीचा दरवर्षी किती? नफा झाला आहे? कारखान्यात निर्माण होणाऱ्या साखरेची प्रत का घसरली आहे. सभासदांना स्वच्छ व पांढरी साखर देण्यात काय? अडचणी आहेत, बायोगॅस प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून अंशतः किंवा पूर्णतः बंद राहिला आहे; त्याच्या दुरुस्तीवर केलेला खर्च किती? गेल्या वर्षभरापासून को-जनरेशन प्रकल्प अपूर्ण क्षमतेने चालत आहे, त्यामुळे कारखान्याचा तोटा होतोय हे खरे आहे? काय? एसडीएफ कर्ज कारखाना आधुनिकीकरणासाठी घेण्यात आल्याचे दिसते; त्याचा विनियोग कोणत्या वर्षी करण्यात आला केन कमिटमेंट चार्जेस सात कोटी ८७ लाख ९३ हजार दिसतात, त्याचा तपशील द्याल काय? चालूवर्षीच्या हंगामातील ऊस पुरवलेल्या सभासदांना प्रतिटन चारशेहून अधिक ऊस बिल देणे बाकी आहे, ते कधी दिले जाईल, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले आहेत.
कारखान्याची निवडणूक मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वार्षिक सर्वसाधारण सभेला विशेष महत्त्व आहे. पण सभा ऑनलाइन होणार असल्याने विरोधकांनी लेखी स्वरूपात हे प्रश्न दिले आहेत.
चौकट : उत्तरे लेखी स्वरूपात द्यावी
कृष्णा कारखान्याची सभा यावर्षी ऑनलाइन पद्धतीने होत आहे. त्यामुळे सर्वांनाच मर्यादा आहेत. म्हणून मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सभा संपल्यानंतर लेखी स्वरूपात मला द्यावी, अशी मागणीही अविनाश मोहिते यांनी या पत्रात केली आहे.