जखमी चिमुरड्याचा मृत्यू
By Admin | Updated: June 30, 2014 23:52 IST2014-06-30T23:41:52+5:302014-06-30T23:52:16+5:30
आई अत्यवस्थ : वाढेफाटा अपघातातील मृतांची संख्या दोनवर

जखमी चिमुरड्याचा मृत्यू
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील वाढे फाट्यावर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा रात्री अकरा वाजता खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्याची आई जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मामा शिवाजी राठोड (वय २२ , रा. उटगी लमाणतांडा, ता. जत, जि. सांगली) याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला होता.
मामा शिवाजी राठोड हा आजारी असलेला भाचा सोहम चव्हाण (वय २) याला दुचाकीवरून दवाखान्यात नेत होता. यावेळी बहीण सायव्वा चव्हाण सोबत होती. वाढेफाट्यावर महामार्ग ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांना कोल्हापूरकडून आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यामध्ये शिवाजी राठोड याचा जागीच मृत्यू झाला तर भाचा सोहम याचा रात्री अकरा वाजता खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायव्वा हिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचीही प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातानंतर टेम्पोचालक पसार झाला असून, अद्याप तो पोलिसांना सापडला नाही. शिवाजी राठोडने सांगली येथे डी. फार्मसीचे शिक्षण घेतले होते. दोनच दिवसांपूर्वी त्याने साताऱ्यातील एका कंपनीत नोकरीसाठी मुलाखत दिली होती. नोकरी लागण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली. पाच बहिणींमध्ये एकुलता एक शिवाजीचा अकस्मात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (प्रतिनिधी)