मोबाईलच्या जगतात चिऊताई झाली भुर्रर्रऽऽ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:23+5:302021-04-20T04:39:23+5:30
कुडाळ : पहाटेच्या प्रहरी गाय-गुरांच्या हंबरण्याबरोबरच पक्ष्यांचा कलकलाट सुरू होतो. अशातच कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताईची चिवचिवही कानी यायची. ...

मोबाईलच्या जगतात चिऊताई झाली भुर्रर्रऽऽ
कुडाळ : पहाटेच्या प्रहरी गाय-गुरांच्या हंबरण्याबरोबरच पक्ष्यांचा कलकलाट सुरू होतो. अशातच कावळा आणि चिमणीच्या गोष्टीतील चिऊताईची चिवचिवही कानी यायची. नियमितपणे आपल्या अंगणात ती पहुडताना दिसायची; मात्र आजच्या मोबाईलच्या युगात ही चिऊताईच कुठे दिसेनाशी झाली झाली आहे. भुर्र... भुर्र... उडून जात नेमकी कुठे गायब झाली आहे, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
आधुनिकतेचे पांघरूण घालून आपण आज प्रगतीची शिखरे सर करत आहोत. हे करत असताना आपल्या बालपणी चिऊ आणि काऊची गोष्ट साऱ्यांनाच आवडायची; मात्र या गोष्टीतील चिऊताई आधुनिकतेच्या विकासाला बळी पडल्याचे दिसत आहे. मोबाईलची क्रांती ही साऱ्यांच्याच फायद्याची ठरली. मात्र, या लहानशा चिऊताईच्या जीवावरच उठली. यामुळे नियमितपणे अंगणात वावरणारी चिमणी आता क्वचितच पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून मोबाईल टॉवर व त्यातून निघणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चिमण्यांच्या संहाराला कारणीभूत ठरले. या लहरींची तीव्रता जसजशी वाढत जाईल, तसा याचा गंभीर परिणाम इवल्याशा चिमणीला भोगावा लागत आहे.
आज जगभरात जवळपास चिमण्यांच्या २६ जाती पाहायला मिळतात. यापैकी भारतात सहा जातींची नोंद आहे. आजच्या परिस्थितीत यांची संख्या मात्र कमी होत आहे. लहान बालकांना जेवण भरवताना एक घास चिऊचा, एक ताईचा म्हणत ही पिढी मोठी झाली आहे. मात्र, येणाऱ्या पिढीला हा इवलासा पक्षी पाहायला मिळेल की चित्रातच पाहावे लागेल, हा प्रश्नच आहे.
मोबाईल टॉवरद्वारे निघणारे रेडिएशन या पक्ष्यांच्या जननक्षमतेवर परिणाम करत आहे, हे आत संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला चिऊ-काऊंच्या गोष्टीमधील चिऊचे पुन्हा दर्शन होण्यासाठी आपणच प्रयत्नशील असायला हवे. अन्यथा पुढील काही वर्षांत चिमणी हा पक्षीच नामशेष होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
(चौकट)
चिमण्यांच्या जननक्षमतेवर परिणाम...
चिमणी हा पक्षी नावाप्रमाणेच दिसायलाही लहान असला तरी निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे. शेतातील किडीचे संतुलन ठेवत चिमण्या एकप्रकारे शेतकऱ्याला मदतच करतात. मात्र, वाढते औद्योगिकीकरण आणि प्रदूषण याचा फटका या लहानशा जीवाला बसला आहे.
मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे चिमण्यांच्या जननक्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यांची संख्या कमी होत असून, यामुळे ही प्रजाती नामशेष न होता त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.