कसरत थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST2021-05-22T04:35:43+5:302021-05-22T04:35:43+5:30
सातारा : जुना मोटर स्टँड ते बुधवार नाका या मार्गाच्या डांबरीकरणााचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. अनेक वर्षांपासून खड्डेमय ...

कसरत थांबली
सातारा : जुना मोटर स्टँड ते बुधवार नाका या मार्गाच्या डांबरीकरणााचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्यामुळे सुरू असलेली परवड थांबल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या मार्गावरून वाहन चालविणेही जिकिरीचे बनले होते. पालिकेने डांबरीकरणाचे काम मार्गी लावल्याने वाहतूक सुकर झाली आहे.
रिफ्लेक्टरची मागणी
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून काही ठिकाणी रिफ्लेक्टर, तसेच दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना संभ्रम निर्माण होत आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे महामार्गावर लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रामुख्याने वाढे फाटा ते लिंबखिंड या परिसरात दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टरला अभाव जाणवत आहे. संबंधित विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
पाण्याचा अपव्यय
सातारा : सातारा शहरातील शनिवार पेठ, बुधवार नाका, शाहू चौक व देवी चौकात असलेल्या व्हॉल्व्हला गेल्या अनेक दिवसांपासून गळती लागली आहे. या व्हॉल्व्हची पालिकेकडून दुरुस्ती केली जात नसल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पालिका प्रशासन पाणी बचतीचे नियोजन करीत आहे. अशा परिस्थितीत व्हॉल्व्हमधून पाणी व वाया जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्वच्छता मोहीम
सातारा : डेंग्यू, मलेरिया, तसेच साथरोगांच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. आरोग्य विभागाच्या पथकाकडून ठिकठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी केली जात असून, नाले व ओढे स्वच्छतेचे कामही हाती घेण्यात आले आहे. शहरातील सदर बझार, माची पेठ, केसरकर पेठ, मल्हारपेठ या भागात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे.
कठड्यांची पडझड
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, तसेच घाटातील रस्त्याचीही ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. खड्ड्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा घाटरस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. त्यामुळे बांधकाम विभागाने संरक्षक कठड्यांसह रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी केली जात आहे.
घाणीचे साम्राज्य
सातारा : सातारा पालिकेकडून ‘कुंडीमुक्त’ सातारा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील सर्व कचरा कुंड्या हटविण्यात आल्या आहेत. महात्मा फुले भाजी मंडई व मार्केट यार्ड परिसरातील कुंड्या हटविल्याने हा परिसर घाणीच्या विळख्यातून मुक्त होईल, असे वाटत असतानाच या परिसरात ठिकठिकाणी कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. या परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.
नियमांचे उल्लंघन
सातारा : संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संचारबंदीच्या अटी शिथिल केल्याने बाजारपेठेत सकाळी सात ते अकरा या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करीत आहे. दुचाकीवरून डबल सीट प्रवास करण्यावर निर्बंध असताना, याकडे नागरिक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
कारवाईला ब्रेक
सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू करण्यात आलेली कारवाई मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. पालिकेकडून काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे.