विमानतळ विस्ताराविरोधात श्रमिक मुक्ती दलाचा मोर्चा
By Admin | Updated: July 7, 2015 22:18 IST2015-07-07T22:18:27+5:302015-07-07T22:18:27+5:30
लोकशाही हक्कांना पायाखाली दाबणे आणि कायद्याच्या तरतुदीला बगल देणे, हे अन्यायकारक आणि लोकशाही प्रणालीला मारक आहे.

विमानतळ विस्ताराविरोधात श्रमिक मुक्ती दलाचा मोर्चा
सातारा : कऱ्हाड येथील विमानतळ विस्ताराला विरोध करत श्रमिक मुक्ती दलातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनावश्यक विस्तार, अशास्त्रीय विस्तार टाळण्यासाठी पुनर्वसन प्राधिकरणासोबत बैठक आयोजित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कऱ्हाड विमानतळ विस्ताराला विरोध करणारी आणि शास्त्रीय व कायद्यांमधील तरतुदींना सुसंगत पर्याय देणारी चळवळ २0११ पासून सुरु झाली. विमानतळ विस्तारिकरण हे पुनर्वसन अधिनियम १९९९, पुनर्वसन प्राधिकरणचे वेगवेगळे शासन निर्णय, राष्ट्रीय पुनर्वसन धोरण इत्यादीच्या आधारावर विचार केल्यास कायद्याच्या कक्षेत बसत नाही. भूसंपादनाच्या प्रत्येक कलमांच्या अंमलबजावणीवेळी बाधितांनी या पायावर आक्षेपही घेतले आहेत. पण या आक्षेपांना सुनावणी घेतली गेली नाही. तसेच उत्तरेही दिली नाहीत.
आजही पूर्वीचे निर्णय काय आहेत, याची पर्वा न करता ‘आता विमानतळ विस्तार अंतीम झाला,’ अशा पध्दतीने संबंधित कार्यालयाचा व्यवहार सुरु आहे. अशा प्रकारे लोकशाही हक्कांना पायाखाली दाबणे आणि कायद्याच्या तरतुदीला बगल देणे, हे अन्यायकारक आणि लोकशाही प्रणालीला मारक आहे. याबाबत चर्चा घडवून येणे आवश्यक असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. साताऱ्यातील मोर्चामध्ये पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, जयसिंग गावडे, गोंविंदराव शिंदे, सिध्देश्वर पाटील आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)